पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२३०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेले नाहीत, तर बदलताही येतील; पण या घाणीत देश बुडाला तर तो पुन्हा वाचवता येणार नाही. तेव्हा स्वतंत्र भारत पक्षाला केवळ मतं नकोत; आर्थिक मदत तर लागेलच; पण प्रत्यक्ष पुढे येऊन स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली जी काही कर्तबगारी आहे, आपली जी काही आभा आहे तिचा समाजामध्ये उपयोग करून स्वातंत्र्याच्या पक्षाला, व्यक्तीच्या हातापायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडणाऱ्या पक्षाला हिंदुस्थानाला दोनशे वर्षांच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी विजयी करून दाखवावं.
 १९९४ मध्ये मुंबईच्या भारतीय विद्याभवनामध्ये स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना झाली. त्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून माझा उल्लेख केला जातो. खरी गोष्ट आहे. राजकारणामध्ये पडण्याची माझी, शेतकरी नेता म्हणून इच्छा नव्हती. पण, चक्रवर्ती राजगोपालाचारीचे पट्टशिष्य आणि नजीकचे सहकारी श्री. मिनू मसानी यांनी आग्रह धरला, की सगळ्या हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन पुढे जाण्याचा नैतिक अधिकार शेतकरी नेता म्हणून तुम्हालाच आहे, तुम्ही ही जबाबदारी नाकारू नये. मोठ्या नाइलाजाने मी ते पद स्वीकारलं. पक्षाच्या पहिल्याच सभेत कायदातज्ज्ञ राम जेठमलानी यांनी एक अजब गोष्ट लक्षात आणून दिली, की हिंदुस्थानातील कायद्याप्रमाणे कोणताही पक्ष स्थापन करायचा असेल आणि त्याला मान्यता मिळवायची असेल तर त्याला तीन शपथा घ्याव्या लागतात. पहिली, लोकशाहीवर विश्वास आहे, दुसरी, निर्धार्मिकतेवर विश्वास आहे आणि तिसरी, माझा समाजवादावर विश्वास आहे. अशी अट तर स्टॅलिनच्या काळामध्ये स्टॅलिननेसुद्धा घातली नव्हती. लोकशाहीवर माझा विश्वास आहे अशी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकऱ्यांनी शपथ घेतली आणि नंतर ते म्हणाले, "हिंदुस्थानात लोकशाही काय घेऊन बसलात, इथे गरज आहे ठोकशाहीची." त्यांनी शपथ घेतली, की आपण निधार्मिक आहोत आणि नंतर त्यांनी सांगितलं, की पक्षाला मान्यता मिळविण्यासाठी मी खोटं बोललो, मी निधार्मिक नाही. मी थोडा कठोर माणूस आहे. मी अशी खोटी शपथ घ्यायला नकार दिला. माझा समाजवादावर विश्वास नाही, समाजवाद हा मनुष्यजातीला लागलेला कलंक आहे, शाप आहे असं मी एक उद्योजकतावादी म्हणून म्हणत असताना 'माझा समाजवादावर विश्वास आहे,' अशी खोटी शपथ घेण्याचे नाकारले. परिणामी, १९९४ मध्ये स्वतंत्र भारत पक्षाचं बीज लावलं गेलं; पण त्याला पक्ष म्हणून मान्यता मिळवता न आल्यानं त्याला खतपाणी घालणं कठीण होऊन गेलं. नंतर अध्यक्षपदाची धुरा मी डॉ. मानवेंद्र काचोळे यांच्या

पोशिंद्यांची लोकशाही / २३२