पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

एवढेच नव्हे, तर घराणेशाही पुढील पिढ्यांतही चालू ठेवण्याकरिता कृतसंकल्प असलेले. पक्षाच्या जाहीरनाम्यात अंतर्भाव झालेले कार्यक्रम एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या इंदिरा गांधींच्या 'गरिबी हटाव' कार्यक्रमांच्या तोंडवळ्यांचे, नव्या जगातील वास्तवाशी संबंध नसलेले, आघाडीतील बहुतेकांचे हात तेलगी प्रकरणासारख्या भ्रष्टाचारात बरबटलेले. भारतीय मतदारांसमोर उभा असलेला दुसरा विकल्प हा असा आहे.
 एकच पर्याय
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ महिन्यांत गांधीजी गेले. गांधींच्या आध्यात्मिक भूमिकेत आणि ग्रमीण अर्थव्यवस्थेच्या विचारात आणि स्वदेशीतही एक आत्मसन्मानाचा स्रोत होता. गरिबीतही स्वाभिमान आणि बाणेदारपणा जिवंत ठेवायची भूमिका होती. गांधींच्या हत्येनंतर नेहरूंनी गांधीविचार संपवला आणि समाजवाद आणला. या समाजवादात देश दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकला. एवढेच नव्हे, तर न्यूनगंडाने पछाडला गेला. समाजवाद संपला; पण त्याबरोबर देशापुढील आर्थिक विषयपत्रिकेलाच ग्रहण लागले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली खुल्या व्यवस्थेचे औपचारिक अनावरण झाले; परंतु उद्योजकांना दिलासा वाटेल, प्रोत्साहन मिळेल असे वातावरण तयार झाले नाही. 'हर्षद मेहता'सारख्या प्रकरणांमुळे उद्योजकता हा भामट्यांचाच खेळ आहे अशी भावना तयार झाली. भ्रष्टाचार बोकाळला. खुल्या व्यवस्थेच्या अर्धवट अंमलबजावणीमुळे स्वातंत्र्याचे फायदे सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले. शेतकरी, मजूर वर्गात असंतोष वाढला. वर्तमानकाळात समाधान नाही आणि उज्वल भविष्याची आशा नाही अशा अंधकाराच्या परिस्थितीत वेगवेगळे समाज आपापल्या इतिहासातील तेजस्वी बिंदूंचे आणि जातींच्या अस्मितांचे उदात्तीकरण करून, त्यांच्याच आधारे राजकारण चालवू लागले. परिणामतः, देशापुढील बिकट परिस्थितीत खंबीर नेतृत्व देईल असा पक्ष किंवा नेता राहिला नाही. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आवश्यकता होती ती समजदार मुत्सद्दी नेतृत्वाची, सगळ्यांना सांभाळून कणाकणाने क्षणाक्षणाने देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या उदारमतवादी कर्णधाराची - एका अब्राहम लिंकनची.
 अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी घडवून आणली, तिने देशाला राजकीय स्थैर्य दिले, आर्थिक विकासाची नवी झेप दिली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, गांधींच्या अस्तानंतर सन्मानाची भावना गमावलेला हा देश आता विकास आणि वैभव यांच्या मार्गावर नव्या सन्मानाच्या भावनेचा

पोशिंद्यांची लोकशाही / २४७