पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

असल्याची घोषणा औपचारिकरीत्या आणि अधिकृतपणे झालेली नाही.
 अशा परिस्थितीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीतील भूमिकेसंदर्भात निर्णय घेणे, ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. माझ्या मनात काही एक निर्णय झाला आहे असे काही नाही. आजपर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये ज्या प्रकारे चर्चा, विचार विनिमय झाले आणि त्यावर आपले निर्णय ठरले, तसेच आजही होणार आहे.
 शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांची राजकीय भूमिका ठरविण्यासाठी आपण आज काही प्रथमच एकत्र जमलो आहोत असे नाही. गेल्या डिसेंबरमध्ये 'विदर्भ राज्य मुक्ती पदयात्रे'च्या समारोप समारंभानंतर नागपूर येथे विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यासाठी आपण ॲड. वामनराव चटप, श्री. लक्ष्मण वडले, डॉ. सौ. शोभा वाघमारे, श्री. रघुनाथदादा पाटील आणि सौ. सरोज काशीकर यांची 'राजकीय निर्णय समिती' स्थापन केली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी या समितीच्या निर्णयानुसार स्वतंत्र भारत पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सदस्यत्व स्वीकारले. या निवडणुकीनंतर परभणी जिल्ह्यातील सेलू येथे २ मे २००४ रोजी कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात लोकसभा निवडणुकीतील प्रचार सहभागाच्या यशापयशाचा आढावा घेऊन स्वतंत्र भारत पक्षाची बांधणी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांशी संपर्क करून, त्यांना स्वभापच्या महाराष्ट्रातील बलशाली जागांची माहिती देण्याची जबाबदारी राजकीय निर्णय समितीवर सोपविण्यात आली. आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे आपली भूमिका पक्की करणे आवश्यक झाले आहे.
 वर्धा कार्यकारिणी : समारोप
 शेतकरी संघटनेच्या इतिहासामध्ये कोणत्याही कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेली चर्चा आजच्याइतकी टोकाची आणि रंगलेली नव्हती आणि इतका कठीण निर्णय करण्याची वेळ माझ्यावर कधी आली नव्हती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आणि माझेही मी अभिनंदन करतो, की २००४ मध्ये, ज्याचे लाखालाखांनी शेतकरी पाईक आहेत अशा संघटनेची आणि त्याच्या राजकीय पक्षाची एवढ्या नाजूक प्रश्नावर निर्णय करण्याकरिता बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये अत्यंत खुलेपणाने, पहिल्यांदा जे क्षुब्ध जिल्हाप्रमुख होते ते बोलले, त्यानंतर मंचावरील उच्चाधिकार समितीतील पदाधिकारी बोलले, त्यानंतर आम्हाला संधी मिळाली

पोशिंद्यांची लोकशाही / २८२