पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

देणाऱ्या एक संपुआ सरकारात मंत्रिस्थान भूषवून आहेत, हेही तितकेच बोलके आहे. कोणत्याही कारणाने का होईना, राजीव गांधींचे वारसदार आणि राजीव गांधींचे खुनी यांची हातमिळवणी झाली.
 अशा तऱ्हेने संपुआ दोन स्तरांची झाली. संपुआ शासनात प्रत्यक्ष सामील झालेल्या आणि अधिकारपदे स्वीकारलेल्या पक्षांचा पहिला स्तर व सरकारात सामील न होता बाहेरून पाठिंबा देणाऱ्या डाव्या व समाजवादी पक्षांचा दुसरा स्तर. संख्येची जमवाजमव तर झाली. नेतृत्व साहजिकच सोनिया गांधींकडे जाणे आवश्यक होते. पण, कितीही नाकारले. तरी विदेशी मुळाच्या व्यक्तीकडे पंतप्रधानपद जाण्यातून काही नाजूक, गुंतागुंतीचे व कठीण प्रश्न उभे राहिले. सरकार स्थापन करण्याचा आपल्या पक्षाचा दावा राष्ट्रपतींपुढे सादर करण्यासाठी मनमोहन सिंहांना बरोबर घेऊन गेलेल्या सोनिया गांधी तेथून बाहेर पडल्यानंतर आपणास पंतप्रधानपदात स्वारस्य नसल्याचे बोलत्या झाल्या. एवढेच नव्हे तर पंतप्रधानपदासाठी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत निवडणूक न घेताच डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव घोषित करून टाकले. ४८ तासांच्या आत संपुआचा 'संयुक्त किमान समान कार्यक्रम' (संकिसका) कागदावर उतरवण्यात आला. त्यावेळी डाव्या पक्षाचे ३३ खासदार मिळवणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता. त्यांच्या पाठिंब्याखेरीज रालोआकडून सत्ता काढून घेणे शक्यच नव्हते.
 जगभरच्या इतिहासाचा अनुभव असा आहे, की कम्युनिस्ट आघाडी करतात ते शेवटी आघाडीतील इतरांना गिळून टाकण्याच्या निर्धारानेच. जागतिकीकरणाच्या आणि खुल्या बाजारपेठेवर आधारलेल्या व्यवस्थेच्या काळात खुद्द कामगार पुढारीसुद्धा, 'स्पर्धेच्या युगात मालक आणि कामगार यांचे हितसंबंध पूर्णतः परस्परविरोधी नाहीत, हे मान्य करत असताना संपुआच्या 'संकिसका'मध्ये कामगार वर्गाच्या नोकरीची सुरक्षितता, त्यांचा भविष्य निर्वाह निधी यांच्याबद्दल अशक्य अशा तरतुदी डाव्या पक्षांनी घुसवल्या. त्यांना विरोध करणे संपुआला परवडणारे नव्हते. त्याबरोबरच, परदेशी गुंतवणूक, किरकोळ व्यापारव्यवस्था यासंबंधीच्या कलमांतही डाव्या पक्षांनी पाचरी मारून ठेवल्या.
 कशाही तऱ्हेने का होईना, रालोआला सत्तेबाहेर ठेवण्यात काँग्रेसला यश आले. अगदी किरकोळ मताधिक्याने सत्तेवर आलेल्या संपुआच्या सदस्यपक्षांतील खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी, 'जितं मया' अशी आरोळी ठोकली आणि ध्रुवबाळाप्रमाणे आपणास हे स्थान कायमपट्ट्याने मिळाले आहे असे वागायला सुरुवात केली.

पोशिंद्यांची लोकशाही / ३०९