पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/४५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सगळ्यांत पहिल्यांदा, लोकांना एक सरकार हवे आहे; शहरात, गावात, वस्तीत, गल्लीत कायद्याचे राज्य आणि शांतता राखू शकणारे सरकार पाहिजे आहे. घरातली कर्ती माणसे, शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुली घरी परतून यायला जरा उशीर झाला, तर आता ती जिवंत दृष्टीला पडत नाहीत अशा भीतीने घरात पाहोचलेली माणसे चिंताग्रस्त होऊन जातात. सगळीकडे दादांचे, गुंडांचे, त्यांच्या हस्तकांचे साम्राज्य पसरले आहे. त्यांची पोच पोलिस स्टेशनपर्यंत नव्हे, तर मंत्रालयापर्यंत आहे. दादांनी पुरविलेल्या पैशांवर पुढारी मंत्री होतात आणि पुढाऱ्यांना पैसे पोहोचवून तरुण उमेदवार पोलिस खात्यात प्रवेश मिळवितात आणि जन्मभर वरपर्यंत हप्ते पोहोचवत राहतात आणि खालून हप्ते उकळत राहतात. सर्वसामान्य लोकांना विश्वास वाटेल असे पोलिस खाते हवे आहे. पोलिस स्टेशनात दादाचा रुबाब आणि सज्जन नागरिकांना दमदाटी हे चित्र बदलायला हवे आहे.

 जीवित सुरक्षित झाले तर लोकांना प्रामाणिकपणे कष्ट करून कमावण्याची आणि आपल्या चिल्ल्यापिल्यांना चोचीत चारा घालण्याची इच्छा आहे. त्यांची मागणी रोजगाराची नाही किंवा सरकारी नोकरीचीही नाही. ते नोकऱ्यांकरिता धावपळ करताना दिसतात, कारण आजच्या व्यवस्थेत घाम गाळून, कष्ट करून हिमतीवर कोणताही व्यवसाय यशस्वी होत नाही असा त्यांचा अनुभव आहे. मिळकत भरपूर आणि काम काही नाही असे फक्त सरकारी नोकरीतच घडते म्हणून नाइलाजापोटी नीच कर्माच्या नोकरीत शिरण्याची धडपड चालू असते. विखारी गरिबीच्या स्थितीत घरातील तरुण मुलींनी देहविक्रय करायला तयार व्हावे, त्याप्रमाणे तरुण मुले निराशेपोटी सरकारी नोकरदार बनून, आरामात जगण्याची स्वप्ने पाहतात. कायदा, सुव्यवस्था राखण्याकरिता सरकार हवे, बलिष्ठ सरकार हवे. याउलट, आर्थिक क्षेत्रात सरकार अजिबात नको, तेथून त्याची हकालपट्टी झाली पाहिजे अशी लोकांची तळमळ आहे. लायसन्स-परमिटचा जाच नसावा. अशाळभूत इन्स्पेक्टरांचा काच नसावा. नोकरशहांची भरती करण्याकरिता करांचा बोजा नसावा. सरकार किमान कर लावणारे टाकटुकीने कारभार सांभाळणारे काटकसरी असावे. बहुतेक सरकारी खाती आणि त्यांवरील खर्च अनावश्यक आहेत, ती खाती बंद करावीत. त्या खात्यांत पंख्याखाली आरामात गप्पाटप्पा करणाऱ्या आणि स्वेटर विणणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना धरणे, कालवे, पिण्याचे पाणी, रस्ते, लोहमार्ग असल्या कामांवर पाठवून त्यांच्याकडून उपयुक्त काम करून घ्यावे. सरकारी करांची पद्धत साधी सोपी असावी. करवसुली अधिकाऱ्यांना लोकांना जाच करण्याची शक्यता नसावी.

पोशिंद्यांची लोकशाही / ४७