पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/९६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

होईल अशी शक्यता पहिल्यांदा तयार झाली आहे.
 आपण ज्याला बळिराज्य म्हणतो, ते तयार व्हायची शक्यता पहिल्यांदा तयार झाली आहे. या बळिराज्यामध्ये प्रत्येक उद्योजकाला आपल्या इच्छेप्रमाणे व्यवसाय करता येतो. त्याला 'सरकार' नावाची कोणी शक्ती सांगत नाही, की हे पिकव, ते पिकवू नको, धाना (भाता)चे तांदूळ करू नको, तांदूळ दुसऱ्या जिल्ह्यात नेऊ नको, परदेशांत नेऊ नको. असं राज्य म्हणजे बळिराज्य आणि असं बळिराज्य तयार होण्याची शक्यता स्वातंत्र्यानंतर प्रथमच तयार झाली आहे.
 तरीही या निवडणुकीमध्ये, सगळे लोक येऊन, मतदारांना काय सांगताहेत? सगळे म्हणतात, आमच्या पक्षाला मतं द्या. काहीही बोला; पण मतं आम्हाला द्या.
 काँग्रेसवाले म्हणतात, "गेली सत्तेचाळीस वर्षे आम्ही देशाला बुडवलं, हे खरं असलं, तरी आम्हाला मतं द्या. पुढच्या वेळी आम्ही देश सुधारू."
 भाजपवाले येतात अन् सांगतात, "आम्हाला मंदिर बांधायचे आहे," म्हणून आम्हाला मतं द्या, दुसरे लोक येतात आणि "आम्ही नोकरीमध्ये कोणत्या जातीला किती जागांचे आरक्षण द्यायचे ते ठरवतो," म्हणून आम्हाला मतं द्या म्हणतात. आंध्र प्रदेशात एन.टी. रामारावांनी म्हटलं, "आम्ही दोन रुपये किलो तांदूळ देऊ..." आणि ते निवडून आले, मुख्यमंत्री झाले; मग महाराष्ट्रातले 'विद्वान' पुढारीसुद्धा बोलायला लागले-
 दोन रुपये किलो तांदूळ देतो म्हटल्यावर मुख्यमंत्री बनता येते, ही नामी युक्ती सापडली. आम्ही काय कमी आहोत का? आम्ही दीड रुपये किलोने ज्वारी देतो.
 आपल्यातले बरेचजण ज्वारी पिकवतात. ज्वारी जर का दीड रुपया किलोने बाजारात विकली, तर ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी काय खायचं, माती? मतांच्या जोरावर खुर्ची मिळते ना, मग काहीही बोला!
 आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोक म्हणतात, "तुम्हाला ज्वारी विकत घ्यायची, ती दळायची, त्याच्या भाकऱ्या करायच्या असा तरी त्रास कशाला? आमच्या पक्षाचा कार्यक्रम असा, की आम्ही तयारच भाकरी-पिठलं तुम्हाला रुपयात देतो!"

 पाहा. देश गहाण पडतो आहे, गरिबी संपत नाही, कर्ज संपत नाही, जगामध्ये देश आपला शेवटच्या क्रमांकाला चाललाय आणि यांचा कार्यक्रम काय तर

पोशिंद्यांची लोकशाही / ९८