पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/९७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाकरी-पिठल्याची दुकानं काढायची! खा आणि मजा करा, स्वस्त भाकरी -पिठलं!
 या निवडणुकीत सगळे पक्ष समोर येऊन जातात - काँग्रेसचा झेंडा घेऊन येतात, जनता दलाचा झेंडा घेऊन येतात, भाजपचा घेऊन येतात, शिवसेनेचा घेऊन येतात; पण या सर्व पक्षांचे खरंच एकमेकांत वैर आहे का? वेगवेगळ्या ठिकाणांहून वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या पाहा. वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट मतदारसंघात मी निवडणुकीचा फॉर्म टाकला आहे. निवडून द्यायचं किंवा नाही, ते मी तेथील जनतेवर सोपवलं आहे.
 मी निवडणुकीला उभा आहे म्हटल्यावर भाजपचं रक्त खवळलं आणि त्यांच्या नेत्यांनी सांगितलं, की काही झालं तरी शरद जोशींना पाडलं पाहिजे. एक वेळ आम्ही शरद पवारांशी दोस्ती करू; पण शरद जोशी आम्हाला परवडणार नाहीत. म्हणजे हिंगणघाटमध्ये भाजप काँग्रेसबरोबर दोस्ती करायला तयार आणि मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे काय म्हणतात? ते उघड उघड म्हणतात, की शरद पवार गुंडांना सामील आहेत, त्यांनी हजारो कोटी रुपये कमावले आहेत, हा भामटा आहे; पण इकडे हिंगणघाटमध्ये मात्र भाजपवाले म्हणतात, शरद पवार परवडला; पण शरद जोशी नको; कारण तो कापसाला भाव मागतो. पुणे जिल्ह्यात जनता दलाचे लोक शिवसेनेशी दोस्ती करताहेत. म्हणजे काँग्रेस, भाजप, शिवसेना, जनतादल हे सगळे एक आहेत. कारण हे सगळे लोक म्हणजे आतापर्यंत निवडणुकीत 'शेतकऱ्यांना लुटण्याचा गुत्ता आपल्यालाच मिळावा,' म्हणून सतत धडपडणारे पक्ष आहेत.
 आता त्यांच्या लक्षात आलं आहे, की शेतकरी जागा झाला आहे, शेतकऱ्याची चोरी होते, ती पकडली गेली आहे. आता काही आपली धडगत नाही. आज जरी दिसत नसलं, तरी पुढच्या निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानातले बाकीचे सगळे पक्ष असं चित्र उभं राहणार आहे. एका बाजूला हे छोटं देवकीचं बाळ आणि दुसऱ्या बाजूला सगळे कंसमामा एकत्र झालेले दिसणार आहेत.

 आमचं म्हणणं काय आहे ? आमचं म्हणणं असं आहे, की स्वातंत्र्यानंतर सत्तेचाळीस वर्षे देश खाली जात राहिला, याचं कारण इंग्रजांनी आपल्या शेतकऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या हातात घातलेल्या बेड्या हातातून निघायच्या आधी समाजवादाच्या बेड्या आमच्या हाती आल्या आणि त्यामुळे हिंदुस्थानात कोणीच सुखी झालं नाही. शेतकरी दुःखी आहे, व्यापारीसुद्धा दुःखी आहे,

पोशिंद्यांची लोकशाही / ९९