पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/11

हे पान प्रमाणित केलेले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा तयार झाली, तेव्हा जोतीबांनी प्रश्न विचारला होता, की- 'अरे, अमेरिकेत नॅशनल काँग्रेस आहे, फ्रान्समध्ये नॅशनल काँग्रेस आहे म्हणून तुम्हीही इथे न्याश्नल काँग्रेस काढता; पण तिथे 'Unified People' (एकमय लोक) या अर्थाने एक 'Nation' (राष्ट्र) आहे. तुमच्याकडे आहे का ? तुमचा सगळा इतिहास हा देशातल्या एका घटकाने दुसऱ्या घटकाला शोषायचा. तो काही केवळ जातीच्याच रूपात उभा राहिला आहे असे नाही. तो धर्माच्या रूपात उभा राहिला आहे, गावाच्या रूपात उभा राहिला आहे. प्रदेशाच्याही रूपात उभा राहिला आहे; मात्र जातीच्या सरहद्दीवरचे शोशण हा या देशातला सर्वांत सनातन इतिहास आहे, यात काही शंका नाही. जर तुम्ही आज स्वातंत्र्य मिळवाल आणि त्याआधी हे एकमय लोक म्हणजे एक राष्ट्र तयार झालेले नसेल, तर इंग्रज जाऊनसुद्धा राज्य कोणाचे येणार आहे?
 जोतीबांनी विचारलेला हा प्रश्न आपण बाजूला टाकला, इंग्रज गेले आणि आमचा देश एकमय लोकांचे एक राष्ट्र बनायच्या आधीच आण स्वतंत्र झालो. मग त्याचे परिणाम काय झाले ? राजकारणी नीतिमत्ता सोडून वागू लागले, राजकारणी व्यावसायिक बनले, राजकारणी गुन्हेगार बनले. याचा अर्थ असा नाही, की त्यांच्या शरीरातील रक्ताचा अंश बदलला म्हणून ते तसे वागू लागले. पूर्वी माणसांच्या अंगात जे रक्त असायचे, तसलेच आज आमच्या अंगात आहे. दोघांच्या नीतिमत्तेत, वर्तणुकीत काही फरक दिसत असेल, तर बाजूच्या परिस्थितीत काही बदल झाला का, हे तपासून पाहिले पाहिजे. इतिहास जाणून घ्यायला नुसत्या घटना समजून चालत नाही, त्याबरोबर त्या वेळची परिस्थितीही लक्षात घ्यायला हवी. नाही तर इतिहासाचा अन्वयार्थच चुकून जातो. माणसे परिस्थितीला अनुरूप अशीच वागत असतात. आज शरीयतला हात लावल्यावर मुसलमान ज्या पद्धतीने विरोध करतात, तितक्याच कडवेपणाने लोकमान्य टिळकांनी संमती वयाच्या बिलाला विरोध केलेला आहे आणि आज मुलसमान जशी कारणे सांगतात, तशीच कारणे देऊन! दोघांच्याही परिस्थितीमध्ये काहीही फरक नाही.

 मग हे असे का घडते? जेव्हा वसाहतवादी किंवा एका घटकाने दुसऱ्या घटकाचे शोषण करायचे अशी पद्धती सुरू झाली, तेव्हा साहजिकच, पहिली गोष्ट घडली, ती म्हणजे सगळ्या सत्तेचे केंद्रीकरण व्हायला लागले, आज विधानसभांमध्ये सत्ता नाही, लोकसभेत सत्ता नाही, कॅबिनेटमध्ये नाही आणि नियोजनमंडळातही नाही. आज सत्ता आहे पंतप्रधानांच्या भोवती, ते जी माणसे गोळा करतील त्यांच्या हाती. राजीव गांधी गेले, त्यांच्या जागी व्ही. पी. सिंग

पोशिंद्यांची लोकशाही / १३