पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/12

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आले, ते गेले आणि चंद्रशेखर आले, तरीसुद्धा या परिस्थितीत काही बदल झालेला नाही. अजूनही, सत्ता आहे ती पंतप्रधानांच्या आसपासच्याच मंडळींच्या हातात. म्हणायला, एक फरक मात्र पडला. पूर्वी वाटायला लागले होते, की सगळी सत्ता एकाच घराण्याच्या हातात राहते की काय? पण तेवढे बदलले. पण स्वच्छता अशी राजकारणात राहिली नाही. त्याबद्दलही तक्रार करण्यात अर्थ नाही, कारण स्वच्छता कुठेच राहिली नाही. जिथे न्यायालयात स्वच्छता नाही, भ्रष्टाचार माजला आहे, तिथे या देशामध्ये बाकीच्या क्षेत्रांत स्वच्छता सापडायची कुठे?
 मग एकएक सत्तांचे जसजसे केंद्रीकरण होऊ लागले, तसतसे त्या केंद्रीकरणामध्ये एक नवीनभाग दिसायला लागला. तो सहज तपासून घेण्यासारखा आहे. तुम्ही १९५१ च्या सगळ्या लोकसभा-विधानसभा सदस्यांची नावे काढून पाहा. या माणसाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही त्याग केला आहे, याने इतके सोसले आहे, कष्ट केलेले आहेत, अशी सेवा केली आहे... अशा प्रकारची यादीच तयार होईल. आज लोकसभा-विधानसभांच्या सदस्यांची यादी समोर ठेवली, तर हा गुंड आहे, हा दादा आहे, याने मार्केट कमिटीचा प्लॉट खाल्ला, याने तिकडचा भूखंड गिळला, याने ही सोसायटी खाल्ली, याने तो कारखाना पचवला... अशी सर्व दादा-गुंडांनी ती भरलेली दिसून येईल. मंत्रिमंडळाची यादीसुद्धा याने एक खून केला आहे, याने दोन, त्याने तीन...अशानेच भरलेली. ही अशी परिस्थिती आहे असे जेव्हा मी एका फार मोठ्या राजकारण्यासमोर म्हटले, तेव्हा ते म्हणाले, 'एवढे तर असायचेच, त्याशिवाय का राजकारणी बनेल?' अशी ही सहजमान्य स्थिती आजच्या राजकारणाची बनली आहे.

 याचा अर्थ, राजकारणामुळे कुणी गुन्हेगार बनले आहेत असा नाही, तर आज गुन्हेगारालाच राजकारण करता येते अशी परिस्थिती तयार झाली आहे. या सर्व परिस्थितीशी संबंधित प्रश्नांची आर्थिक उत्तरे देण्याचे आपण टाळतो; कारण ती उत्तरे मिळविण्याकरिता आपल्याला जोतीबा फुल्यांकडे जावे लागते. त्याऐवजी मग वेगवेगळ्या जाणिवा तयार केल्या जाऊ लागल्या. कुठे जातीच्या, कुठे धर्माच्या, प्रदेशाच्या तर कुठे भाषेच्या. कारण त्याच्यात एक फायदा असतो. आर्थिक मुद्दा मांडला, तर तो प्रत्येक माणसाला जाऊन समजावून, पटवून द्यावा लागतो. पण, उदाहरणार्थ, कोणी थोडा आवाज चढवून हिंदुत्वाविषयी बोलायला लागले, की त्यात एक फायदा असतो. अगदी मुंबईत बसून जरी हिंदुत्वाच्या ललकाऱ्या फेकायला लागले, की काही नाही तरी एक चतुर्थांश हिंदू त्याच्या

पोशिंद्यांची लोकशाही / १४