हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वातंत्र्य लढ्याच्या प्रभावाने आणि संस्कारांनी! वयाच्या सतराव्या वर्षी ‘भारत छोडो आंदोलन' आणि दुसरे महायुद्ध' या पार्श्वभूमीवर ते लष्करात दाखल झाले पण देशभक्तीचे बाळकडू रोमारोमात भिनलेल्या का. मा. आगवणे या जवानास लष्करापेक्षा आझाद हिंद सेना आकर्षक वाटू लागली. सेनेत त्याने बंडाचा झेंडा उभारण्याचा प्रयत्न केला पण त्यास यश आले नाही.

 सेनेतून निवृत्त होऊन का. मा. आगवणे यांनी पोलीस दलात प्रवेश मिळवला. इथे पण त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देईना. भ्रष्ट अधिकारी नि वरिष्ठांविरुद्ध त्याच्या तक्रारींचा पाढा काही पूर्ण होत नव्हता. उलट हा शिपाई गडी पोलिसात राहून राष्ट्र सेवादलाची शाखा चालव, समाजवादी पक्षांच्या शिबिर, मेळाव्यास उपस्थित राहा, साने गुरुजी कथामाला चालव असे उद्योग करत राहायचा. पोलीस दलात गुप्तवार्ता विभागात काम करत असलेले का. मा. त्यांना हे कळत नव्हतं अशातला भाग नव्हता. राष्ट्रभक्ती, देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

 मग स्वारीनं होमगार्डकडे मोर्चा वळवला. सन १९५५ ते ६५ पर्यंत त्यांनी हे कार्य केलं नि स्वतःस पण पूर्णवेळ समाजकार्यात झोकून दिलं. प्रारंभी समाजवादी पक्ष. नंतर त्या पक्षाच्या फुटीनंतर काँग्रेसमध्ये. मग पुलोद नि आता ते राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते, कारण राजकारणात यशवंतराव चव्हाण यांना प्रमाण मानून ते बिनीचे शिलेदार झाले नि शरद पवार यांचे पाठीराखे बनले. साधा कार्यकर्ता ते पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय आलेख. राजकीय उदय व विकास, विस्ताराची कथा सांगते. ती मुळात वाचत असताना राजकारण ही युद्धासारखं रोमहर्षक असतं हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. यातच ‘माझी कर्म कहाणी' या का. मा. आगवणे यांच्या आत्मकथेचं यश सामावलेलं आहे. ते त्यांनी मनस्वीपणे लिहिलं असल्यानं या आत्मकथेला सहज उत्स्फूर्त आठवणींचा उमाळा मिळत गेला व लेखक हे ओजपूर्ण आत्मचरित्र लिहू शकला असं वाटतं. कुठंही जोडा-जोडी नाही. ते आहे ते आत-बाहेर एक... निखळ हे या आत्मकथेचं बळ आणि संचित म्हणून सांगता येईल.

 का. मा. आगवणे यांची ही कर्मकहाणी म्हणजे एका अस्वस्थ अश्वत्थाम्याची तगमग होय. जो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतून वर येतो त्यांच्या वंचितांच्या वेदना सतत अशांत ठेवतात अन् मग तो माणूस ध्यास व ध्येयाने झपाटून आपणाला अधिक चांगलं कसं करता, जगता येईल ते पहात रहातो. जिथे जातो तिथे ‘गैराशी वैर वागणं' हा का. मां. चा

प्रशस्ती/१३४