हे पान प्रमाणित केलेले आहे.

जोखीम असते. जन्मलेले अपत्य... त्याचं पहिलं मुखदर्शन म्हणजे विश्व जिंकल्याचा आनंद! तो क्षणिक असतो. दुस-याच क्षणी जबाबदारीची न संपणारी यादी सुरू होते. दूध, गुटी, अंगडे-टोपडे, औषध, नाव, बारसं, खेळणी, डॉक्टर, पाळणा, वाढदिवस, संगोपन, संस्कार, शिक्षण... हनुमानाची शेपूटही छोटी होईल इतकी लांबलचक यादी व लांब पल्ल्याचं भविष्य!

 बाळ जन्म ही प्रत्येक दांपत्यासाठी एक अननुभूत क्रिया असते. गर्भ जन्माला आला की बाळ चाहूल माणसास जिज्ञासा, स्वप्नांच्या न संपणाच्या प्रदेशात घेऊन जाते. प्रसूतिपूर्व गर्भ संगोपन' हा बालसंगोपनाचा खरं तर पाया, प्रारंभ. त्याबाबत मात्र या पुस्तकात दुर्लक्ष झालंय खरं! सवयींचं बीजारोपण गर्भावस्थेत होत असतं. गर्भाचं पोषण, वाढ, विकास हे आईला मिळणाच्या पोषण व विकासाचं प्रतिबिंब व प्रतिकृती असते. गेले काही दिवस आम्ही काही बालविकासाचे कार्य करणारी मंडळी महाराष्ट्र शासनाचे बाल धोरण ठरवत आहोत. त्याच्या मसुद्यात आम्ही आवर्जून, प्राथमिक संगोपनात जन्मपूर्व काळजी, संगोपनाचा अंतर्भाव केला आहे. जन्मपूर्व नऊ महिने नऊ दिवस (-९.९) यात गर्भधारणा ते गर्भवाढ, गर्भ संगोपन, गर्भ पोषण, गर्भ आरोग्य, गर्भ उपचार यांचा आवर्जून अंतर्भाव केला आहे. कारण गर्भ सुदृढ, सुरक्षित तर बाळ संगोपन सुदृढ, सुगठित. गर्भसंस्कार नावाची गोष्ट काय असते ते मला कळत नाही. मला कळतं गर्भ वाढ, पोषण व काळजी, उपचार. ते वैज्ञानिक म्हणून वास्तव. बालसंगोपन ही आध्यात्मिक, धार्मिक बाब नसून ती शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे हे एकदा आपण सर्वांनी, विशेषतः सुजाण, सुशिक्षित पालकांनी समजून घेतलं की गर्भ संस्कारासारख्या थोतांडास फार अर्थ उरत नाही.

 गर्भ वाढ झाली, गर्भ पोसला की बाळाचा जन्म होतो. बाळ ही कल्पना लिंगनिरपेक्ष आहे. पुत्र वा कन्या हे दोन्ही जीव त्यात गहीत आहेत. जिवात लिंगभाव प्रगट होत नाही तोवर ते पालकांच्या लेखी बाळ असतं. फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाने मात्र बाळ जन्मतः लैंगिक भावना घेऊन येतं असं म्हटलं आहे. जन्मतः बाळ अनेक वृत्ती, वैशिष्ट्य, गुण, दोष घेऊन जन्मतं. अनुवंशाने बाळात काही गोष्टी येतात असं जे म्हणतात त्यात गर्भावस्थेत आई आणि वडिलांच्या गुणसूत्रांच्या, जनुकांच्या मिलाफातून जन्मलेला नवा जीव आई-बाबांच्या गुणांच्या वृत्तीच्या गोळाबेरजेतूनच नाही तर वजाबाकी, गुणाकार, भागाकारांनी जन्मलेला स्वतंत्र जीव असतो. जिवाची वाढ म्हणजे परिसर, पर्यावरण, परिस्थितीचा प्रभाव, अनुवंश व परिस्थिती या दोघांचं फलित म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास. त्यात वृत्ती व

प्रशस्ती/१४०