या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


विकल्पवाट (कविता संग्रह)
सौ. मंदाकिनी देसाई
२0१४

_________________________________________________


पंख अडकलेल्या पाखराची तडफड


 ‘विकल्पवाट' हा सौ. मंदाकिनी देसाई यांचा कवितासंग्रह वाचला. संग्रहाचं शीर्षक मोठं सूचक नि सार्थ आहे. माणूस कविता का लिहितो? त्याचं उत्तर आहे विकल्पवाट शोधण्यासाठी. माणसाची कविता काय असते? ती असते एक विकल्पवाट, माणूस जगत असताना समाजाची मी मान्यता चौकट स्वीकारते. ती समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक असते. पण माणूस उपजत दुभंग असतो. शरीर या चौकटीत व्यवहार करतं. मन मुक्त असतं. ते कधी मनाच्या अंतरंगात खोल डुबकी मारतं तर कधी उंच आकाशात भरारी. अंतर्मनात कवी डोकावतो. तेव्हा त्याचं अप्रगट मन व्यक्त होतं. जेव्हा तो निसर्गात विचरतो ते त्याचं प्रगट मन असतं. या दोन्हीचं मीलनही घडतं. तिथं निसर्ग जीवनास भिडतो.


 मंदाकिनी देसाईंची कविता ही मूलतः स्त्री मनाचा उद्गार आहे. त्याला कोंडमारा म्हणणं जास्त सयुक्तिक होईल. ती ज्या चौकटीच्या जगात जगते ते तिचं जग नाही. तिचं जगणं म्हणजे अंतर्मनातील घालमेल. ती घालमेल एका आई, पत्नी, बहिणीची आहे. ती प्रगट घालमेल. पण अंतर्मनातील कालवाकालव सत्यरूपात, थेट व्यक्त करणं आपल्या मर्यादाप्रधान समाजात व्यभिचार ठरतो. मग ती कवितेची विकल्पवाट धरते आणि स्वतःला व्यक्त करत राहते.


प्रशस्ती/२५९