या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समर्थक कवी वसंत भागवत म्हणतात की असे विवाह पासंगालाही सापडत नाही. कवीचा विचार बरोबर असला तरी आज समाज जीवन प्रगत होते आहे आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह संख्या वाढते आहे. अशा विवाहांना होणारे प्रतिक्रियात्मक विरोध कालौघात विरून, विरघळून जाताना मी रोज पाहतो आहे. असे काम मी गेले अनेक वर्षे करत असल्याने परिवर्तित समाजमनाचं माझं आकलन सकारात्मक आहे.
 कवी समाज रचनेच्या संदर्भात विधायकतेचा पुरस्कर्ता आहे. त्यास हिंसा अमान्य आहे. मतभेदापोटी रक्ताचे पाट वाहणे त्यास मंजूर नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारण कशासाठीही हिंसा तो त्याज्यच मानतो. यावरून त्याची समाजशीलता ‘महायुद्ध' सारख्या काव्यसंग्रह शीर्षक कवितेतून स्पष्ट होते. धार्मिक भाईचारा, जातीय बंधुता केवळ गाण्यात नको, आचरणात असण्याचा आग्रह आपल्या कवितेतून करणारे वसंत भागवत भावनेच्या पेक्षा विचारावर कृती ठरवण्याच्या पक्षाचे आहेत हे महत्त्वाचे. ‘महायुद्ध' काव्य संग्रहातील महायुद्ध भावनिक, सामाजिक, व्यावहारिक सर्व प्रकारची आहेत. ‘तुझा काही दोष नाही', ‘मी का तो', 'देह', 'धग', ‘संगत' सारख्या कवितात प्रेम, प्रणय, वासना, विरहाचं युद्ध, द्वंद्व, काहर कवींनी शब्दबद्ध केलं आहे. 'लाखोल्या', ‘पूरग्रस्त', ‘फास', 'व्यभिचार' सारख्या रचना सामाजिक दोषांवर प्रहार करत समाज जीवन निकोप ठेवण्याचा प्रयत्न करताना प्रतिबिंबित होतात. साहित्यिक’, ‘साधा भोळा कवी' या कविता कवीच्या प्रतिभासंपन्न स्वप्नांची अपत्ये होत. ‘पानझड', ‘दुष्काळ' रचना पर्यावरणाच्या पण त्यामागेही समाजमन डोकावताना आढळतं.
 या संग्रहातील अधिकांश कविता या बालबोध शब्दवळणाच्या असल्या, तरी कवितेतील कवी मनाची संवेदना अस्सल आहे. ऐन तारुण्यातील कविता अनुभवांच्या तोकडेपणामुळे नेहमीच सुबोध राहते. त्यात न व्यामिश्रता असते न संप्रेषणीय कलात्मकता. पण कविता ही जेव्हा कवीच्या भोगाचे प्रतिबिंब किंवा प्रतिक्रिया म्हणून सहजस्फूर्त जन्मते तेव्हा तिचं असं अस्तित्वबोधी योगदान राहतं. ते ‘महायुद्ध' काव्यसंग्रहातील काव्यरचनात आपणास पाहायला मिळेल. काही कवितांत कवी भागवत बोलीचा वापर करतात. तेव्हा ती कविता वाचकास अधिक भिडते. मेंदूचा भेजा फ्राय होणे' सारखे वाक्प्रचार कवितेस समकालीन भाषेचे वाहकसिद्ध करतात. ‘व्यभिचार'मधील कवीची भावतीव्रता, प्रतिक्रिया स्वाभाविक व प्रभावी आहे. लिंगभाव विरहित समाजाचे स्वप्न कवी वसंत भागवतांचं भाबडेपण। सिद्ध करतं. 'कल्लोळ' मधील टाहो हृदय पिळवटणारा आहे. भडभुंज्यांच्या


प्रशस्ती/२६३