या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्ञानदीप (बालकविता संग्रह) अशोक पाटील गमभन प्रकाशन, पुणे

प्रकाशन - जानेवारी, २00८
पृष्ठे - ६४ किंमत - ३२/

नव्या बालकवीच्या नव्या कविता


 मराठी बालकविता सुंदर नि सुस्वर केली ती बालकवी ठोंबरे यांनी. त्यांची कविता निसर्गस्पर्शी खरी. शिवाय ती बालचमूस भुरळ घालणारी म्हणूनही प्रसिद्ध! विसाव्या शतकातील या कवी नि काव्याची परंपरा जपणारे एकोणिसाव्या शतकातील ‘नव बालकवी' म्हणून अशोक पाटील यांचा परिचय करून द्यायला हवा. त्यांची बालकविता नवे विषय, नव्या कल्पना, कालसंगत मांडणी घेऊन येते म्हणून तिचं वर्णन ‘नव बालकविता असेच करावे लागेल.

 नव बालकवी अशोक पाटील हे संवेदनशील प्राथमिक शिक्षक होत. आताशा गावाकडेच शिल्लक राहिलेलं भाबडेपण त्यांच्यात आहे. असं असलं तरी त्यांना नागरी बालविश्व बदलल्याची जाण आहे. त्यांचा पिंड शिवारातील दगड-माती, गवत, रानफुलं यावर पोसला असल्यानं त्यांच्या कवितेत निसर्गही सतत पोसावर आलेला आढळतो. ज्ञानदीप' हा त्यांचा पहिला बालकविता संग्रह होय. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याच्या योजनेतून त्यांना अनुदान लाभले आहे. गमभन प्रकाशनाने या नव्या बालकवीचं कवितेतील पहिले गमभन साहित्याच्या पाटीवर गिरवून त्याला एक प्रकारे गौरवान्वित केले आहे. ही बहुगुणी बालकविता आमचे गुरूबंधू व ज्येष्ठ बाल साहित्यिक

प्रशस्ती/६२