या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकराजा शाहू व अन्य एकांकिका (एकांकी संग्रह)
डी. के. रायकर
वंदना रायकर, कोल्हापूर
प्रकाशन - सप्टेंबर, २०११
पृष्ठे - ७0 किंमत - ५0/
_________________________________

रंगमंचीय एकांकिका


 ‘लोकराजा शाह व अन्य एकांकिका' हा डी. के. रायकर यांच्या पाच एकांकिकांचा संग्रह होय. रायकर हे मूलतः शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक असले, तरी त्यांच्यात एक प्रयोगशील नाटककार दडलेला आढळतो. माणसात अनेक गुण सुप्त असतात. ते प्रसंगाने, गरजेने प्रकट होत असतात. माध्यमिक शाळेत विद्याथ्र्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व संस्कारांसाठी नित्य नव्या स्पर्धा, महोत्सव, मेळावे, कार्यक्रम होत असतात. कधी कधी ते विशिष्ट विषयाला वाहिलेले असतात. त्या विषयानुषंगिक सादरीकरणासाठी तयार साहित्य प्रत्येक वेळी हाती येतंच असं नसतं. मग तिथे शिक्षकाची कसोटी पणाला लागते. विशेषतः वर्तमान वा तात्कालिक संदर्भ वा विषय प्रतिबिंबित करणारं नाटक, निबंध, एकांकिका, कविता, कथा मिळणं दुरापास्त असतं. अशावेळी रायकरांसारखा शिक्षक प्रश्नास आव्हान मानून मार्ग काढतो. मग तो स्वतःच लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, चित्रकार होतो. यासाठी माणसात शिक्षक नामक वृत्ती उपजत असावी लागते. ती रायकरांकडे असल्याने त्यांनी विविध एकांकिका स्पर्धांत भाग घेण्याच्या गरजेतून या एकांकिकांचं लेखन केलं असलं तरी त्यात कलात्मकता, विषय नावीन्य, रंगमंचीय भान असल्याने त्या एकांकिका नामांकित नाटककाराच्या तोडीच्या झालेल्या आहेत.


प्रशस्ती/८८