पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/100

हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिस्तबद्ध दर्शन घेता येतं. त्यासाठी कशाला हवा पोलीस बंदोबस्त?"

 यात्रेकरूंच्या या बदलत्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेऊन वातावरण पूर्णत: सुरळीत करावं म्हणून चंद्रकांतनं आणखी एक खेळी खेळली.

 मंदिराच्या बंद प्रवेशद्वारी हातात माईक घेऊन तो म्हणाला, “शांत व्हा. यात्रेकरूंनो, शांत व्हा. कावडधाऱ्या बाबांचा पोलिसांनी अपमान केल्याबद्दल मी, तुमचा तहसीलदार, क्षमा मागतो. माझा तुमच्या भाविकतेवर विश्वास आहे. तुम्हाला फक्त दर्शन हवं आहे. ते दहा मिनिटात सुरू होईल. मी तुमच्या भरवशावर मुद्दाम पोलिसांचा मंदिरावरील बंदोबस्त काढून घेतला आहे. तुम्ही रांगेत शांतपणे दर्शन घ्या."

 मंदिराच्या पुजाऱ्यांना, एक सेकंदाला एक या किमान गतीनं यात्रेकरूंना दर्शन घेता यावे याचे नियोजन समजावून सांगून त्याने मंदिराचे दार उघडले.

 त्यानंतरचे दोन तास त्या मंदिराच्या प्रवेशद्वारी माईकवर चंद्रकांत कीर्तनप्रवचनाच्या शैलीत बोलत होता आणि त्यांच्या श्रद्धेला, परंपरेला जागवत होता. यात्रेकरू शांत व शिस्तबद्ध राहून दर्शन घेत होते.

 चंद्रकांत तिथं उभा होता. एकटा, नि:शस्त्र! वातावरणानं जर विपरीत वळण घेतलं असतं तर त्याची खैर नव्हती. त्याच्यापुढे साताऱ्यांहून निघालेले पोलीस अधीक्षक व त्यांची पोलीस पार्टी येईपर्यंत दुसरा पर्याय नव्हता. त्याचं यात्रेकरूंच्या मानसिकतेचं आकलन अचूक ठरलं होतं. त्यांच्यासमोर ढालीसारखं उभं राहणं परिणामकारक ठरलं होतं.

 पोलीस अधीक्षकांसोबत त्यांचे प्रशासनातले पहिले गुरू जिल्हाधिकारी व्ही. पी. राजा आले होते. त्यांनी बंदोबस्त लावला आणि चंद्रकांतनं सुटकेचा नि:श्वास टाकला. पुढील सारी यात्रा सुरळितपणे पार पडली.

 एका आठवड्यानंतर महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी चंद्रकांतला हा "ऑन-द-स्पॉट" अनुभव कथन करायला लावला. अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. समारोप करताना कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचे अनुभवसिद्ध विचार मांडले.

 "धार्मिक यात्रा-सणांच्या बंदोबस्ताची ड्युटी करताना त्याबाबतची परंपरा व धार्मिक रीतिरिवाजांची पूर्ण माहिती आवश्यक आहे. या प्रकरणात खान यांना मंदिराच्या बंदोबस्ताला ठेवणं ही प्रशासनाची चूक होती. ते मुस्लीम आहेत म्हणून हिंदू धर्मीयांच्या यात्रेच्या बंदोबस्ताला त्यांना ठेवू नये, असं मला म्हणायचं नाही. त्यांना यात्रेचे ज्ञान नव्हतं आणि त्यांनी करून घ्यायचा प्रयत्न केला नाही म्हणून. बाब अगदी साधी होती. कावडधारी महत्त्व त्यांनी जाणून घेतलं असतं

प्रशासननामा । ९९