पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/106

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणणे आणि ते पदार्थ मिळवणे सुरू झाले.

 रात्र चढत होती. चंद्रकांत व तहसीलदार आवारात खुच्र्या टाकून कामावर देखरेख करत होते. लालाणीही त्यांना सामील झाला व आपल्या विनोदी ढंगात तहसीलदारांना म्हणाला, “आजतक तहसीलदारोंको बहुत सारे काम करते हुवे मैने देखा है. आज तुम लोगोंको पपडी बेलनेको लगानेवाला पहला डिप्टी कलेक्टर देखा। कल मैं मिनिस्टर साबको ये जरूर बताऊँगा!"

 तहसीलदार व सर्व कर्मचारी लालाणीच्या या विधानाशी शंभर टक्के सहमत होते. ते सर्व दिलखुलास हसले. एक नवा जोम त्यांच्यात संचारला होता.

 पहाटे सहा वाजता पोत्यांमध्ये अन्नाची पाकिटे भरून दोनशे पोती ट्रकमध्ये भरून विमानतळाकडे रवाना केली तेव्हा चंद्रकांतने सुटकेचा नि:श्वास टाकला.

 विमानतळावर केंद्रीय नियोजन मंत्री बरोबर सात वाजता आले. त्यांच्यासोबत कलेक्टर भावे व काही आमदार, खासदार होते. ते हेलिकॉप्टरनं पाण्याने वेढलेल्या गावाची पाहणी करून अन्नाची पाकिटं टाकणार होते. कलेक्टरांनी चंद्रकांतला हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची सूचना दिली. नव्याने, अवघ्या पाचसहा महिन्यांपूर्वी, रुजू झालेल्या चंद्रकांतला अनपेक्षितपणे मंत्र्यांसमवेत हवाई सफर घडणार होती.पण ऐनवेळी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विमानतळावर आले. त्यांना हेलिकॉप्टरमध्ये घेणे भाग होते. त्यामुळे चंद्रकांतला त्यांच्यासाठी जागा खाली करून द्यावी लागली. तो चांगलाच हिरमुसला. त्याची समजूत काढताना वयोवृद्ध समंजस निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले,

 “चंद्रकांत, ही तर तुझ्या करिअरची सुरुवात आहे. प्रशासनात कलेक्टरांना, आय.ए.एस.वाल्यांना महत्त्व असतं. त्यांच्यानंतर आपण असतो. हे सूत्र लक्षात ठेव, की कलेक्टरांना मान मिळाला की त्यातच आपला मान आहे असं समजायचं?"

 केंद्रीय मंत्र्यांची हवाई पाहणी चांगल्यारीतीने पार पडली होती. पाण्यानं वेढलेल्या गावांना अन्नाची पाकिटे संजीवनीप्रमाणे वाटली होती. पूर ओसरल्यानंतर अशाच एका गावचा सरपंच म्हणाला होता. "तुम्ही लोकांनी अन्नाची पाकिटं टाकली, ते लई बेस केलं. लहान मुलं, बायको, झालंच तर म्हातारी-कोतारी भुकेली होती. कारण गावातलं रॉकेल संपलं होतं. व सरपण ओलं म्हणून पेटत नव्हतं. तुम्ही सायब लोकांनी अन्नदान करून लई पुण्याचे काम केलं बगा."

 आंध्र प्रदेशातील ताज्या पुराने झालेल्या हाहाकाराच्या संदर्भात चंद्रकांत हा पंधरा वर्षांपूर्वीचा किस्सा सांगून इनसायडरला म्हणाला, “मित्रा, या सरपंचाची

प्रशासननामा । १०५