पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/107

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती प्रशस्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण करिअरच्या सुरुवातीलाच प्रचंड पुराच्या आपत्तीला तोंड द्यावं लागलं होतं. रात्रीतून साऱ्या कर्मचा-यांना कामाला लावून दहा हजार अन्नाची पाकिटं तयार करणं सोपं काम नव्हतं. तिथे मी कसोटीला खरा उतरलो. अंगभूत गुणांनी म्हणा, की करुणाबुद्धीनं, चाकोरीबाहेरचे निर्णय घेऊन काम करता आलं हे माझे नशीब व भाग्य! अन्न पाकिटं कमी पडली तेव्हा मुरमुरे, गूळ, शेंगदाणे वा चणेफुटाणे, बत्तासे देणं हे मला सुचलं हे महत्त्वाचं; कारण वेळेची मर्यादा व केंद्रीय मंत्र्यापुढे प्रशासनाची तत्परता जाणवणं आणि त्याहीपेक्षा पूरग्रस्त जनतेला खराखुरा दिलासा मिळणं हे महत्त्वाचं काम माझ्या हातून झालं. आदर्श आपत्तीव्यवस्थापन दुसरं काय असतं? प्रसंगाला खरं उतरणे व काम करणं!"

 त्याच पुराच्या काळातला दुसरा प्रसंग त्यानं कथन केला.

 पूर ओसरल्यानंतर प्रशासनापुढे प्रचंड कामे होती. जिल्ह्यात दीडशेच्या वर गावात पुराचं पाणी शिरून घरांची खूप हानी झाली होती. त्यांना तातडीची मदत - खावटी - म्हणून वाटायचं काम आता सुरू करायचं होतं आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर गावाचे पुनर्वसन व घरांची दुरुस्ती व बांधणी करायची होती.

 खावटी मदत म्हणजे अनुदान. घरात पुराचं व पावसाचे पाणी शिरलं तर भांडीकुंडी व धान्य-कपडे वाहून नष्ट होतात व घरात राहणं अशक्य होतं. परिणामी त्यांचा रोजगार बुडतो. म्हणून पंधरा दिवस माणशी-प्रतिदिनाच्या हिशोबाने काही रोख रक्कम दिली जाते. तिला खावटी म्हणतात.

 ते खावटी वाटपाचे काम करायचं होतं. त्याची प्रक्रिया बरीच किचकट होती. प्रथम गावात जाऊन घरांची पाहणी करणं, किती घरात पुराचं पाणी जाऊन नुकसान झालं याचा पंचनामा करणं, घरातील माणसांची संख्या मोजणे व परत तहसीलला येऊन अहवाल तयार करणे. रक्कम मंजूर करून ती गावी जाऊन वाटणे. या बाबीसाठी कितीही तातडीने काम करायचं म्हटलं तरीही आठ-दहा दिवस किमान लागतात. त्यात सर्वेक्षणात काही गडबड झाली वा तक्रार आली, की तिच्या चौकशीत व निर्णय घेण्यात पुन्हा आणखी आठदहा दिवस सहज जातात.

 जिल्ह्यात पुरामुळं एवढी प्रचंड वाताहत झाली होती की पूरग्रस्त कुटुंबांना तातडीनं खावटी वाटण्याची नितांत गरज होती.

 एका तालुक्याची जबाबदारी चंद्रकांतवर कलेक्टरांनी सोपवली होती. त्या तालुक्यात सुमारे बत्तीस गावे पूरग्रस्त झाली होती. सुमारे पाच हजार घरांची

१0६ । प्रशासननामा