पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/122

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसरी नुकतीच वयात आलेली पंधरासोळा वर्षांची किशोरी होती. त्या दोघी शेतमजूर होत्या. त्या इथल्या उरुसासाठी आल्या होत्या.

 मुल्ला फारूख चिश्तीच्या नावाने भरणारा या शहराचा उरूस फार प्रसिद्ध आहे. त्यासाठी हिंदु-मुस्लीम दोघेही नवस बोलून त्या फकिराच्या नावे बकरी कापून 'कंदुरी' करतात. तो नवसाला पावतो व मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे.

 “म्या-म्या, माजं आत्तेच्या मुलाशीच लगीन व्हावं, तेनं शहरात नव्या बाईला तिथल्या शानशौकीला भुलूनशानी डोरलं बांदू नये म्हणूनशानी म्या नवस बोलला होता आन् कंदुरी केली होती."

 त्या तरुणीची फिर्याद वाचताना चंद्रकांत विमनस्क झाला. तिचं विवाहाचं स्वप्न त्या निघृण बलात्कारानं भंगलं गेलं होतं. तिच्या आत्याचा मुलगाच काय, पण समाजातील कोणताही तरुण तिला या मागासलेल्या भागात स्वीकारणं शक्य नव्हतं. तिचा नवस व कंदुरी वाया गेली होती.

 त्या दोघी इथं आल्यावर कंदुरीसाठी बकरं घेण्यासाठी व ते कापून देण्यासाठी जत्रेच्या जवळच असलेल्या खाटिक गल्लीत गेल्या होत्या. तिथं त्या दोघींना ते आरोपी तरुण भेटले. त्यांच्या शिकारी नजरेनं त्या दोघी परगावाहून उरुसासाठी आलेल्या आहेत हे हेरलं.

 "आमी दोगी पयल्यांदाच इतकं दूर उरुसालं आलो व्हतो. त्यामुळे ते तिथे आम्हास्नी मदत करणाऱ्या भावापरमाणे वाटतले. तेंनी कंदुरीसाठी बकऱ्याचा सौदा जमवून दिला. मंग आमास्नी होटलात जेवायला चलण्याचा अग्रेव केला. आम्ही जलमात कंदी हॉटेलात जेवलो नव्हतो, मनुनशानी व्हय म्हनलं."

 चंद्रकातला बासू भट्टाचार्यांच्या 'आस्था' या सिनेमाची आठवण झाली. त्यातील मध्यमवर्गीय नायिकेला पंचतारांकित हॉटेलच्या चकचकीत वातावरणाचा मोह पडतो व एका अनोळख्या माणसाला वातानुकूलित खोलीत देह देत त्या वातावरणाचा उपभोग घेते, हे पाहताना चंद्रकांतला धक्का बसला होता. काहीतरी असंभाव्य व अतर्क्य पाहात आहोत असं त्यावेळी त्याला वाटलं होतं. पण आज बासू किती सच्चा व काळाच्या पुढे होता हे जाणवून गेलं. खेडेगावात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या मुलीला शहरातील उंची हॉटेलमध्ये जेवण व सिनेमाला जाणं याची भूल पडू शकते, नव्हे, त्यात असंभव असं काही नसतं हे प्रत्ययास येत होतं.

 फिर्यादीमधील पुढील भाग म्हणजे गल्लाभरू हिंदी सिनेमात शोभणारा घटनाक्रम होता.

प्रशासननामा । १२१