पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/127

हे पान प्रमाणित केलेले आहे.



जात नाही ती जात



 शहरातील बँक अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टरांची वाट बघत होते. त्यांना भेटण्यासाठी मुंबईचे काही अधिकारी आले होते, म्हणून, त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी या नात्यानं चंद्रकांत सामोरा गेला होता.

 इंडियन बँकेचे शाखाप्रमुख ठाकूर यांना रात्र पोलिस कस्टडीत काढावी लागली होती. ते चिडलेले होते. ठाकूर यांच्याबरोबर इतर बँक अधिकारीही होते. झाल्या घटनेचा निषेध करीत मोर्चानं प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते आले होते. चुरगळलेले कपडे, एक दिवसाची वाढलेली दाढी व रात्रभर न झोपल्यामुळे लाल झालेले डोळे. विदीर्ण चेहऱ्यावरून ठाकूरांनी रात्र कशी काढली असेल याची कल्पना येत होती.

 ॲट्रोसिटीच्या कायद्याखाली नगरसेविका पारूबाई लहाने हिने दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे ठाकूरांना अटक केल्याचे समजले, तेव्हा चंद्रकांतला धक्काच बसला. ठाकूर यांनी पारूबाईला जातीवाचक शिवीगाळ केली असेल हे शक्य वाटत नव्हतं.

 पारूबाई इंडियन बँकेत, आपल्या वार्डातील मारुती वाघमारे या कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीसह मॅनेजर ठाकूरकडे गेल्या होत्या. 'नगरसेविका म्हणून सौजन्याची वागणूक देणे दूरच. उलट कर्ज मंजूर करत नाही.' असे सांगत चक्क जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिली होती. ॲट्रोसिटीच्या कायद्याप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करणे हा 'नॉन बेलेबल ऑफेन्स' असल्यामुळे पोलिसांना ठाकूरांना अटक करणे भाग पडत होते. त्यामुळे त्यांना सारी रात्र कोठडीत काढावी लागली होती.

 “सर, मी देवाशपथ सांगतो, मी त्या पारूबाईला किंवा त्या मारुती वाघमारेला जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही. वाघमारेच्या कर्ज प्रकरणाची फाईल आमच्या त्याबद्दल फिल्ड ऑफिसर्सनी प्रोसेस करून नकारात्मक अभिप्राय

१२६ । प्रशासननामा