पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/133

हे पान प्रमाणित केलेले आहे.

केलेल्या आहेत; पण तो तलाठी म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे सर. त्याला निलंबित न करता केवळ त्याची बदली करावी. फार तर सर्कल आण्णांनी प्रस्तावित केलेली सजा तशीच ठेवावी. पण त्या हरामखोराशी आपण अकारण वैर घेऊ नये.'

 ‘खरं सांगतो सर - आम्हाला तुमच्या बदनामीची काळजी वाटते.'

 चंद्रकांतला हसू आवरणं कठीण जात होतं. तो काहीशा व्यंगात्मक स्वरात म्हणाला,

 ‘वा प्रांतसाहेब, डी.एस.ओ. साहेब आणि तहसीलदारसाहेब! तुम्ही तिघे त्याला घाबरता हे मी ऐकून होतो, आज त्याची प्रचिती आली.'

 थोडं थांबून त्या तिघांच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव ताडीत चंद्रकांत पुढे म्हणाला,

 ‘आपल्या तिघांच्या संयुक्त समितीने चौकशी करून निष्कर्ष काढले आहेत. तो तलाठी भाऊराव व गिरदावार (मंडल अधिकाऱ्याला मराठवाड्यात जुन्या निजामी पद्धतीनं गिरदावार म्हणतात) कल्याणराव हे दोषी ठरतात, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यासाठी त्यांना निलंबित करून रीतसर विभागीय चौकशी करणं हाच एकमेव पर्याय आहे, त्यावर आपलं एकमत झालं होतं. तुम्ही दोघांनी चौकशी अहवालावर सही केली आहे, मग आता अशी विनंती का? फाईल तर कलेक्टरांकडे गेली आहे.'

 'ती फाईल मी पी.ए. कडेच रोखली आहे, सर,' जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले.

 चंद्रकांत खवळला, 'हाऊ डेअर यू?'

 'थोडं शांत व्हा सर. मी सारं सांगतो.' आपलं अनुभवकौशल्य पणाला लावीत ते म्हणाले, 'आज दुपारी प्रांतसाहेबांच्या कार्यालयात त्या तलाठी भाऊरावानं एका बाजारी बाईला पाठवलं होतं, त्यांना बदनाम करण्यासाठी. तुम्हाला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी. पुढे कार्यवाही करू नये किंवा ती पातळ करावी म्हणून. मी सुदैवानं त्यांच्या तालुक्यातच दौ-याला होतो. मला कळताच मी ते प्रकरण कसं तरी मिटवलं. तिथला पी.एस.आय. माझा कोमटी जातभाई होता. त्यालाही भाऊराव ही चीज माहीत होती व ती बाजारूबाई पण... त्यामुळे प्रांतसाहेबांविरुद्ध विनयभंगाची तक्रार गुदरली गेली नाही एवढंच! म्हणून आम्ही तिघे आलो आहोत आपल्याकडे. आपण शांतपणे विचार करावा.'

 चंद्रकांत थक्क होऊन त्या तिघांकडे पाहत राहिला.

 सामान्य दिसणारा तलाठी भाऊराव धूर्त, कावेबाज होता. तालुक्यातील

१३२ । प्रशासननामा