पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/136

हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्भवला होता. तो कसाबसा निस्तरला गेला, पण त्यानं हबकलेले प्रांत अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी त्याच्याकडे अहवाल बदलण्याची विनंती घेऊन आले होते.

 ‘सर, या माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगानं तरी तुम्हाला भाऊराव ही काय चीज आहे याची कल्पना आली असेल! तुम्ही पदोन्नतीवर लवकरच जाणार आहात बदलून, तर मग कशाला त्या माणसाचं झंझट मागे लावून घेता? पुन्हा आपण चौकशी अहवाल कितीही कडक दिला, तरी रीतसर विभागीय चौकशीत मागेपुढे तो सुटणारच. कशाला आपण संभाव्य बदनामी - तीही अशी नाजूक चारित्र्याची मोल घ्यायची?'

 चंद्रकांत रात्रभर विचार करीत होता. त्याला समाजमन चांगलंच माहीत होतं. समाजमनास भ्रष्टाचार, पैसे खाणं याचं फारसं काही वाटत नाही, पण स्त्री-संदर्भातील बदनामी तो खपवून घेत नाही. असा बदनाम होणारा माणूस मग समाजरचनेत बहिष्कृत होत जातो. चंद्रकांत त्याबाबत सर्व बाजूंनी विचार करीत होता व समजा उद्या तसं काही आपल्या संदर्भात झालं तर काय, याची मनाशी पडताळणी करीत होता. पण तीव्र भावना मनात होती की, भाऊरावसारख्या क्षुद्र पण मस्तवाल तलाठ्यापुढे नमायचं नाही, कारण तसं केल्यास स्वत:ची प्रतिष्ठा व आत्मसन्मानास ठेच पडणार होती.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच कार्यालयात कलेक्टरांना भेटून कालचा सारा प्रसंग सांगून चंद्रकांत म्हणाला,

 'सर, आय रिअली डोंट नो - व्हॉट विल हॅपन? पण मी जर चांगला, प्रामाणिक व सरळमार्गी असेन तर माझं वाईट होणार नाही. अच्छे आदमी के साथ हमेशा अच्छाही होता है, यावर माझा ठाम विश्वास आहे. पण तुम्ही मला साथ द्यावी, अशी विनंती मात्र करीन!'

 चंद्रकांतनं आक्रमण हाच भक्कम बचाव असतो, या उक्तीप्रमाणे एक असाधारण गोष्ट केली. त्यानं भाऊराव व कल्याणरावांना आपल्या दालनात बोलावून घेतलं. चार अधिकारी व पत्रकारांच्या साक्षीनं त्याला खडे बोल सुनावीत यापुढे असं करू नये अशी तंबी दिली. आणि पत्रकारांना चौकशी अहवालाची असाक्षांकीत प्रत बातमीसाठी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी, ज्यांच्या पक्षाचे सावंत होते, रस घेतल्यामुळे पत्रकारांनी ही बातमी व भाऊरावाच्या मागील कर्तृत्वाचा पाढा वाचणाऱ्या खमंग बातम्या छापल्या. त्यामुळे भाऊराव त्याच्या सर्व्हिसमध्ये प्रथमच हतबल झाला व त्यानं नांगी टाकली.

 या प्रकरणाची धूळ खाली बसल्यानंतर चंद्रकांतशी एकदा गप्पा मारताना

प्रशासननामा । १३५