पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/150

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीन तारखा झाल्या. त्यांचा निकालही अनपेक्षित आला. उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मधल्या काळात शासनाने स्थापन केली असल्यामुळे व त्यावर जातीचा अभ्यास असणारे तज्ज्ञ असल्यामुळे त्याकडे प्रथम दाद मागावी व त्यानंतर हवे असेल तर उच्च न्यायालयात दाद मागावी, असा निकाल दिला. येथे निकाल भाऊच्या बाजूने निर्णायक लागला असता तर कदाचित त्याला वर्षभराच्या कालावधीत शिल्लक असलेल्या तीन महिने दही दिवसांसाठी नगराध्यक्षपद मिळू शकले असते.

 भाऊने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील केलं, पण त्याचवेळी तो चंद्रकांतला म्हणालाही होता, “सर, मी खरंच बेडा जंगम जातीचा आहे व मी केवळ पद मिळविण्यासाठी खोटं प्रमाणपत्र मिळवलं नाही, हे सिद्ध व्हावे म्हणून अपील केलंय. पण त्याचा निकाल केव्हा येईल देव जाणे; तोवर माझं व्हायचं ते नुकसान झालंच ना आधीच नव्या कायद्याप्रमाणे नगराध्यक्षाचा कालावधी अवघा एक वर्षाचा. मला जेमतेम तीन महिनेही ते मिळाले नाहीत."

 "आय ॲम रिअली सॉरी भाऊ! जर कलेक्टरसाहेबांनी प्रकारण काढून घेतलं नसतं तर..."

 “नो. मी तुम्हाला दोष देत नाही!" भाऊ विमनस्क हसत म्हणाला,

 "माझं नशीबचं फुटकं, त्याला कोण काय करणार? ही घटनेची ७३ व ७४ वी दुरुस्ती येईपर्यंत मी कधी नगराध्यक्षपदाची स्वप्नंही पाहू शकलो नव्हतो, कारण मी सत्ताधारी जातीत जन्मला आलो नाही ना! तीन टाईम निवडून आलेल्या टीममध्ये अध्यक्षपदांपासून वंचित असलेला मी एकटाच नगरसेवक आहे. दुस-या दोघांनी सलग पाच वर्षे ते पद भूषविले. आता नव्या कायद्याने मला तो प्राप्त झाला आणि फक्त एका वर्षासाठीच. तर माझ्याच पक्षातील काही जणांनी घात केला. मी आमदारकीला लायक झालो असलो तरी कधी त्याची स्वप्नंही पाहिली नव्हती. तरीही माझ्यावर ही वेळ यावी, याचा मला खेद वाटतो."

 आणि चंद्रकातच्या मनातली ही खदखद त्याच्या नकळत ओठावर आली.

 "मला खरंच आमच्या कलेक्टर साहेबांचं कळत नाही. त्यांनी किती चुकीचं आणि बोलू नये असं, पण माईंड अप्लाय न करता जजमेंट दिलं."

 “हा तुमचा निरागस, भाबडा समज आहे सर!" भाऊचे वकील किंचित हसून म्हणाले, “तुम्हारा कलेक्टर बहोत पहुँची हुई चीज है। वो तो नगरनारायणका भगत है।”

प्रशासननामा । १४९