पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/163

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ओळखून खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला, तेव्हा तू म्हणालास,

 “देवाच्या दारी सर्व समान. मग कशाला हवी खुर्ची ?"

 त्यामुळे गावकरी विलक्षण प्रभावित झाले असणार. कीर्तनानंतर तू त्यांच्याशी बोलू लागलास आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या उद्धृत करीत गावकऱ्यांना स्वकर्तव्याची जाणीव करून दिलीस. त्यावेळी म्हणालास, “माझे आताचे स्वकर्तव्य म्हणजे जमीन महसुलाची आणि करांची वसुली. ते पैसे शासनाला भरणे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही आपला स्वधर्म निभावणार, की मला कडक वागायला लावून माझा स्वधर्म पाळायला भाग पाडणार?"

 तुझी ही मात्रा खरोखरच, जालीम होती. सगळ्यांनी त्या संध्याकाळी पूर्ण गावाची वसुली तलाठ्याकडे जमा करून गाव बेबाक केलं!

 मित्रा, या दोनच प्रसंगातून तुझी मला खरी ओळख पटली.आपण बदलीमुळे दुरावलो असलो, तरी मला तुझी आठवण येते. तेव्हा मन एका समाधानानं भरून येतं. कडक वागणं आणि तरीही लोकप्रिय असणं, हे तुला जमलं आहे. आमदार, मंत्री व इतर पदाधिकारीही तुला सहजतेनं माऊली म्हणूनच पुकारतात आणि तुझ्याविरुद्ध कोणी तक्रार केली म्हणतात, 'माऊली मुद्दाम तुमच्याविरुद्ध काही करणार नाही. तुमचं काम खरं असेल तर त्यांना परत जाऊन भेटा. नियमात असेल तर काम जरूर होईल.'

 अर्थात, राजकीयदृष्ट्या जमवता न आल्यामुळे माझ्या तीनदा सलग बदल्या झाल्या. बदली या हुकमी अस्त्राचा वापर करून लोकप्रतिनिधी कार्यक्षम अधिकाऱ्यांना खच्ची करू शकतात; पण मित्रा, तू स्वत: काही जाणीवपूर्वक न करताही कधी अप्रिय झाला नाहीस. त्याचे कारण मी शोधायचा प्रयत्न केला. तेव्हा असं लक्षात आलं की, आपले बहुसंख्य लोकप्रतिनिधी ग्रामीण भागातले, शेतकरी कुटुंबातले असतात. त्यांच्या घरात कुणी ना कुणी तरी, पंढरपूरची वारी करत असते. गावयात्रा, भागवतसप्ताह, भजन-पूजन-कीर्तन या गोष्टींनी समाज बांधला जात असतो. तो सामाजिक व्यवहार आहे. ही शतकांची परंपरा आहे. जनतेला अश्रद्ध-नास्तिक नेता चालत नाही. त्यामुळे जनमानसाची नाडी ओळखणारे नेते हे मनाने कसेही असले तरी आपल्या कृतीतून व व्यवहारातून जनतेच्या धार्मिक भावना कुरवाळीत असतात. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष जगणारा तु, त्यांना मूर्तिमंत माऊली वाटतोस. तुझं काम कधी कधी त्यांना अप्रिय वाटत असलं, तरी तुला विरोध करायला ते धजत नाहीत. त्यामुळे तू प्रसंगी राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे, पण जनहितकारक काम नेटाने पार पाडतोस. तरीही तुला पदावरून हटवायचा विचार त्यांच्या मनात आणता येत नाही.

१६२ । प्रशासननामा