पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/164

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण तुझी ‘वारकरी अधिकारी' ही जनसामान्यात रुजलेली प्रतिमा. म्हणून मित्रा, मला भरवसा आहे की, तू प्रत्येक ठिकाणी असाच, तडफेने समाजहिताचे काम करीत राहशील.

 तुझ्या सहकारी मित्रानं तुझ्या संदर्भातला सांगितलेला एकच किस्सा इथं लिहिणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं एक काम असतं सरबराई. अर्थात बंदोबस्त. सर्किट हाऊसवर बड़े अधिकारी येतात तेव्हा पुरवठा अधिकारी तिथं संपर्क अधिकारी म्हणून कायम असतो. अगदी चांगल्या अधिकाऱ्यांनाही हे काम टाळता येत नाही. त्यांचे खालचे अधिकारी-कर्मचारी यात वस्ताद असल्यामुळे सारं काही सांभाळून नेतात आणि ते डोळ्यावर कातडी ओढून स्क्स्थ बसतात. पण तुझा खाक्याच काही और. तुझ्या एका बड्या व तुला वरिष्ठ असणाऱ्या अधिका-याला नववर्षाची पार्टी देण्याची सणक आली. त्यानं तुला बोलावून ती पार्टी आयोजित कर असे म्हटले. सामिष व मद्यपानासह. तेव्हा तू ताडकन म्हणालास, "हे शक्य नाही सर. माझा महिन्याचा अख्खा पगार खर्चला तरी ही पार्टी होणार नाही आणि मी खालच्या माणसांना त्याबाबत सांगणार नाही. मला माफ करा!"

 प्रशासनामध्ये असे सुनावणे आणि तेही वरिष्ठांना, मोठे जोखमीचे आहे. त्यांच्या हाती गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार असतात. आपली पदोन्नती त्यावर अवलबून असते.

 मित्रा, तू अपवाद आहेस व एकमेव - असं म्हणणं अतिशयोक्ती होईल, पण दुर्मीळ नक्कीच म्हणता येईल. अंगीकारलेल्या नीतिनियमाचे पालन कितीही अडचणी आल्या तरी तडजोड करायची नाही, माघार घ्यायची नाही आणि परिणामाची पर्वा करायची नाही, ही त्रिसूत्री तू ज्ञानराज माऊलींकडून, त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून शिकलास.

अगा स्वधर्म हा आपला ।
जरी का कठीण तू जाहला ।
तरी तोचि अनुष्ठिला
भला देखे

 मित्रा, तू आपला स्वधर्म जाणला आहेस. प्रशासनातलं स्वकर्तव्यही तेवढ्याच सहजतेनं अंगीकारलं आहेस. तुझ्या आध्यात्मिक अधिकाराचा वापर तू कुशलतेने, शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी करतोस आणि

प्रशासननामा । १६३