पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/172

हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रशासनाचा विचका करणारा हातखंडा दुहेरी खेळ!



 “एकवेळ तुम्ही सहन कराल पण तुम्हाला कोण्या लुंग्यासुंग्यानं करप्ट, भ्रष्टाचारी म्हटलेलं मी नाही सहन करणार." घरात शिरता शिरता अश्विनीचा स्फोट झाला.

 आज तिला घरी यायला बराच उशीर झाला होता. तिचा उतरलेला चेहरा पाहून चंद्रकांतला वाटलं, आज काहीतरी मनस्ताप देणारं घडलं आहे. तोष्णीवाल वकिलांच्या कार्यालयात त्यांची ज्युनिअर वकील म्हणून रोज संध्याकाळी अभ्यासासाठी जात असे. वकिली सुरू करून पाच-सहा वर्षे झाली असली तरी त्या वातावरणाची सवय झाली नव्हती. म्हणून अनेकदा ती ते मनाला लावून घ्यायची. त्याचं ओझं मनावर घेत घरी यायची. आजही तसंच काही मनाला न पटणारं घडलं असणार, असं चंद्रकांतला वाटलं, पण त्यानं आपणहून तिला काहीच विचारलं नाही. काही वेळाने ती आपणहून सांगेल; ते त्याला माहीत होतं आणि झालंही तसंच.

 भोजनानंतर ती म्हणाली, “आज मी त्या माजी आमदाराची सरांच्या साक्षीनं चांगलीच खरडपट्टी काढली. चंद्रकांत, त्यानं तुझ्यावर केलेले आरोप मला सहन झाले नाहीत. मग स्वत:वर कंट्रोल ठेवता आला नाही.

 "तू आप्पासाहेब बलकवडे यांच्याबद्दल बोलते आहेस?"

 "हो, त्यांची रॉकेलची केस सरांकडेच होती ना?"

 चंद्रकांत गंभीर झाला. कारण कालच आप्पासाहेबांनी आयुक्तांकडे त्याच्याबद्दल तक्रार केली होती. ते गेल्यानंतर आयुक्तांनी त्याला बोलावून त्याबाबत विचारले असता, चंद्रकांतने अप्पासाहेबांची तक्रार तद्दन चुकीची आणि खोटी आहे असे सांगितले होते. त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आणि कागदपत्रे, पुरावा पाहून आपण निकाल दिला, त्यांना तो मान्य नसेल तर पुरवठा मंत्र्याकडे अपील करू शकतात, असेही त्याने म्हटले होते.

 “आय ॲग्री वुईथ यू." म्हणून आयुक्तांनी अप्पर आयुक्तांना ही केस

प्रशासननामा । १७१