पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/181

हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती व समर्पकपणे जमीनदाराच्या वकीलाचं म्हणणं खोडून काढलं होतं व आपण दिलेली किंमत योग्य असल्याचं सांगितलं होतं.

 पण न्यायाधीशांचे मध्ये मध्ये विचारले जाणारे गैरलागू प्रश्न ऐकून चंद्रकांतच्या मनानं धोक्याचा इशारा दिला. आपल्याप्रमाणे त्यांनाही तो माजी नगराध्यक्ष ॲप्रोच झाला तर नाही ना!

 साक्षीच्या आदल्या दिवशी चंद्रकांत मुक्कामाला त्या रात्री मुख्यालयी आला होता. तेव्हा रात्री त्याला ते माजी नगराध्यक्ष भेटायला आले होते. त्या कुप्रसिद्ध गिरगावकर वकीलासह. जे केवळ भूसंपादनाच्या प्रकरणाचीच प्रॅक्टिस करत असत. हे रॅकेट त्यांनीच विकासित केलेलं होतं.

 “सर, तुम्ही इथे प्रांत असताना हा निवडा लिहिताना आम्ही टेन पर्सेटची ऑफर दिली होती, ती तुम्ही नाकारली, पण इतरांकडील प्रकरणात आम्ही समान ऑफर देऊन इथेच मोबदला वाढवून घेतलाच की! आणि तुम्ही दिलेल्या निवाड्यात अपील करून न्यायाधीशांकडून हवी तेवढी वाढ घेतलीच. नुकसान तुमचंच झालं! आता तुम्ही साक्षीला आहात, तरी आमच्या वकीलांच्या प्रश्नांना सूचक होकारार्थी उत्तर द्या. बस् तुमच्यावर काही आळ येणार नाही. कारण निर्णय कोर्टाचा असेल. तुम्हाला या सेवेसाठी वाढीव मोबदल्याच्या वन पर्सेट देऊ. ती रक्कमही काही लाखापर्यंत आहे साहेब. विचार करा."

 मनोमन चंद्रकांत ताठरला होता. माजी नगराध्यक्षाला तो कसा आहे, हे का माहीत नाही? तरीही त्यांची हिंमत कशी होते? हा प्रश्न होता. म्हणजेच या मधल्या काळात, मागच्या पाच वर्षात पुलाखालून खूप काही पाणी वाहून गेलं आहे. इथलं रॅकेट जोरात चाललं आहे.

 चंद्रकांतनं अधिक माहिती काढून घ्यावी म्हणून काही प्रश्न विचारले, तेव्हा गिरगावकरांनी जो खुलासा केला, त्यामुळे तो चक्रावून गेला.

 त्या... न्यायाधीशांनी साक्षीमध्ये जर चंद्रकांतने अनुकूल उत्तरं दिली नाहीत तर जजमेंटमध्ये वाढीव मोबदल्याचं, शाब्दिक कसरत करीत समर्थन करण्यासाठी दुपटीनं मागणी केली होती. म्हणून ते दोघे चंद्रकांतकडे वन पर्सेटची ऑफर घेऊन आले होते!

 साक्षीच्या वेळी चंद्रकांतनं निरीक्षण केलं होतं की, ते न्यायाधीश कोऱ्या चेहऱ्यानं व निर्विकार नजरेनं समोर भिंतीकडे पाहत आहेत. त्याला नजर देण्याचं टाळत आहेत. कारण तो प्रत्येक प्रश्नाची सविस्तर, सडेतोड, तरीही न्यायालयाची बेअदबी होऊ नये म्हणून नम्र भाषेत उत्तरे देत होता.

 जेव्हा त्याची खात्री पटली की, न्यायाधीशही मॅनेज झाले आहेत, तेव्हा

१८० । प्रशासननामा