पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘बरोबर आहे साहेब. कु-हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना? तुम्ही हिंदूंच्या बाबतीत असं वागणारच. पण हाच न्याय तुम्ही मुस्लिमांना लावणार का? कसब्यात मुस्लिमांनी रस्त्याचा एक चतुर्थांश भाग व्यापून मशिदीचा विस्तार केला आहे. तो आपण पाडणार का?'

 ‘तेथेही हाच न्याय लावला जाईल.'

 मोर्च्यातील हिंदूचे त्या आश्वासनाने समाधान झाले नाही; पण त्याची बातमी मुस्लिमात हा हा म्हणता गेली.

 तो शुक्रवार होता. दुपारच्या नमाजानंतर मौलवींनी आवाहन केले. मशिदीचा रस्त्यात येणारा तथाकथित भाग प्रशासनानं पाडायला प्राणपणाने मुस्लिमांनी विरोध करावा. रात्रीतून मंदिर हलविले तसा प्रकार होऊ नये म्हणून चोवीस तास मशिदीचे रक्षण करण्यासाठी पहारा बसविण्याचे ठरविले.

 मराठवाडा हा एकेकाळी निजामाचा भाग होता. हैदराबादशी जवळचा संबंध आजही आहे. मार्गदर्शनासाठी येथील मुस्लीम समाज हैदराबादच्या मौलवींकडे व राजकीय नेत्यांकडे पाहात असतो. त्यांनी तातडीने शहरास भेट दिली आणि वातावरण तापत गेले.

 पंधरा दिवसांनी रस्त्याचे काम कसब्यात पोचले. चंद्रकांतने प्रथम एकशे चव्वेचाळीस कलम लावीत बाहेरच्या पुढाऱ्यांना शहरबंदी केली. तापलेले वातावरण शांत करून शहरातील महत्त्वाच्या दोन्ही समाजांच्या नेत्यांची बैठक बोलावली.

 ‘हा रस्ता तुम्ही सर्व शहरवासीयांसाठी आहे. अनधिकृत मशिदीच्या विस्तारामुळे अडथळा निर्माण झालेला आहे, हा विस्तारित भाग मोकळाच आहे, तेथे कोणतेही धार्मिक कार्य होत नाही. हा भाग पाडला तरी मूळ मशिदीला व त्याच्या पावित्र्याला धक्का पोहोचत नाही. तरी तुम्ही विचार करावा. मी आवाहन करतो की, आपण स्वत:हून रस्त्यामध्ये असलेला भाग पाडावा.'

 ही आमच्या मजहबमध्ये ढवळाढवळ आहे, सर.'

 'हे पहा, हा धार्मिक प्रश्न नाही, रस्त्याच्या बांधकामाचा व त्यावरील अतिक्रमण दूर करण्याचा प्रश्न आहे. रस्ता होणारच हे लक्षात घ्या. रस्त्यामध्ये हिंदूचे मंदिर होते, ते मी स्वतः हटवले आहे. तुमच्या मशिदीचा केवळ एक कोपरा रस्त्यात येत आहे, तो फक्त मागे घ्यायचा आहे. इथे मशीद हटविण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा समजुतीनं घ्यावं, अशी इच्छा आहे. नाही तर प्रशासनाला कठोर व्हावं लागेल.'

प्रशासननामा । ३१