पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/37

हे पान प्रमाणित केलेले आहे.

साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी होते. म्हणून पहिल्या टप्प्यातच साक्षरता अभियानासाठी या जिल्ह्याची निवड झाली होती. १५ ते ४५ वयोगटातील सुमारे दोन लक्ष स्त्री-पुरुषांना एका वर्षात साक्षरतामालेची तीन पुस्तके शिकवून लिहिण्या-वाचण्याइतपत साक्षर करायचे होते. शिवाय मूल्यशिक्षण व कार्यात्मक साक्षरता याचेही धडे त्यांनी आत्मसात करावे अशी अपेक्षा होती.

 संतोखसिंग हा भारतीय प्रशासन सेवेतील पंजाबचा अधिकारी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने, तळमळीने काम करणारा तेथे कलेक्टर होता. त्याने प्रकल्प अहवाल करण्यापासून ते अभियान यशस्वी होण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. सर्व अधिका-यांना व कार्यकत्र्यांना प्रेरणा देत या अभियानात सामील करून घेतले होते. विभागीय आयुक्त व शासन यांना आग्रहपूर्वक सांगून चंद्रकांतला अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नेमून त्याच्याकडे साक्षरता अभियानाचं काम सोपविले होते.

 सरंजामशाही व निजामी राजवट यामुळे आलेला संथपणा स्वातंत्र्यानंतर चारपाच दशकातही या जिल्ह्यात कमी झालेला नव्हता. सुपीक व जलसिंचित असा हा जिल्हा, पण ऐषआरामी सुस्त जनता, कूपमंडूकवृत्तीचे सत्ताकारण आणि अंतर्गत संघर्षात रमलेले राजकारणी नेते यामुळे नैसर्गिक अनुकूलता असूनही हा जिल्हा विकासात मागे पडला होता. पंजाबसारखे धान्य कोठार बनावे अशी क्षमता, पण तेथे एकही साखर कारखाना वा सूतगिरणी व्यवस्थित चालत नव्हती. सर्व सहकारी संस्था राजकारण, बेसुमार नोकरभरती व वारेमाप उधळपट्टी यामुळे एकतर डबघाईस आलेल्या वा दिवाळखोरीत (अवसायात) गेलेल्या. त्यामुळे साक्षरता कार्यक्रमाबाबत नेते व कार्यकर्ते उदासीन होते. त्यांचा पाठिंबा व सहकार्य नसूनही चंद्रकांत व जाधवसारखे सहकारी अधिकारी यांची मनापासून साथ घेत संतोखसिंग यांनी हे अभियान उत्तमप्रकारे चालविले.

 ४०,००० स्वयंसेवी कार्यकर्ते दररोज एक तास साक्षरता वर्ग घेण्यासाठी पूर्ण वर्ष मिळाले. त्यात महिला, युवक व अगदी आठवी-नववीमध्ये शिकणाच्या मुलामुलींचाही सहभाग होता. राजकीय नेते व कार्यकर्ते या अभियानात नसले तरी जिल्हा परिषदेचे शिक्षक मात्र या उपक्रमात मनापासून सामील झाले. संतोखसिंग हे जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी असताना त्यांचा शिक्षकांशी चांगला समन्वय होता. चंद्रकांतनेही तालुक्यातालुक्यात शिक्षकांचे मेळावे घेऊन त्यांना आवाहन केले. एक शिक्षक एका गावासाठी, आठ-दहा गावांसाठी एक केंद्र प्रमुख शिक्षक आणि तालुका पातळीवर तहसीलदार व गटशिक्षण अधिकारी अशी साखळी कार्यान्वित केली गेली. एकाचवेळी सर्व तालुके घेऊन व अभियान

३६ । प्रशासननामा