पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/18

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण सामाजिक धनसंचयाचे विनियोजक आहोत. सार्वजनिक पैशांचा विनियोग सत्कारणी करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणा-या विश्वस्त अण्णांच्या या जाणिवेतून बरेच शिकता येण्यासारखे आहे.
 स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चतुःसूत्रीवर नवा समाज निर्मिण्यासाठी व तशी रचना अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक वृत्ती व उपाय म्हणून महात्मा गांधींनी विश्वस्त कल्पनेचा पुरस्कार केला होता. विश्वस्ततेची संकल्पना विशद करताना ते म्हणाले होते की, “व्यक्तीच्या हाती जी अतिरिक्त संपत्ती येते ती समाजहितासाठी आहे, असे मानून स्वतःच्या, सहका-याच्या नि संपत्ती निर्मिणाऱ्या घटकांच्या सहविचाराने सामाजिक अपेक्षांच्या पूर्तीसाठी तिचा विनियोग करणे म्हणजे विश्वस्त बनणे होय." महात्मा गांधींच्या विश्वस्त संकल्पनेत विश्वस्तांची विश्वासार्हता गृहीत आहे. विश्वस्तांच्या विश्वासार्हतेवरच विश्वस्त संपत्तीचा समायोजपोग विनियोग अवलंबून असतो. विश्वस्त अण्णा हे महात्मा गांधींच्या स्वप्नाचे मूर्त रूप म्हणता येईल. अण्णांनी विश्वस्त संस्थाकडे असलेल्या पैशाचा समाजहितासाठी विनियोग तर केलाच, पण स्वतःच मिळणारे मानधनदेखील सामाजिक संपत्तीतून आलेले आहे, याचे भान ठेवून त्या व्यक्तिगत मानधनातूनही त्यांनी समाजोपयोगी काम केल्याचे मी पाहिले व अनुभवले आहे. कुणा कार्यकर्त्यांच्या मुलाची फी भागव, कधी नाडलेल्या कार्यकर्त्यास वैद्यकीय उपचारासाठी पैसे दे, कधी एखादा तरुण कार्यकर्ता दिसला तर त्याला स्वतःच्या पैशाने प्रायोगिक संस्था दाखव, अशा छोट्या सामाजिक कार्यात त्यांनी अनेकदा आपले मानधन खर्च केल्याचे मी पाहिले आहे. आजच्या स्वकेंद्रित युगात ही सामाजिक बांधिलकी केवळ दुर्मिळ म्हणावी लागेल.

 या लेखाने सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन विचारास प्रवृत्त केले तरी ती अण्णांना वाहिलेली खरीखुरी आदरांजली ठरेल. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे नावाचा संन्यस्त कर्मयोगी, मानवातील मांगल्य शोधणारा निःस्पृह, प्रामाणिक विश्वस्त होता. अण्णा विश्वस्त होते, हे आपल्या समाजाचे मोठे भाग्य होते. त्यांच्या विश्वस्त होण्याने सामाजिक संस्थांची प्रतिष्ठा वाढली. आपले लघुजीवन विशाल सामाजिक जीवनात विसर्जित करून अण्णांनी समष्टी माहात्म्य समजावले आहे.

प्रेरक चरित्रे/१७