पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/19

हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजसेविका : तारा अली बेग

सन १९३७ ची गोष्ट. अवघे वीस वर्षे वय असलेली एक विवाहित मुस्लीम युवती मुलकी सेवेत उच्चपदावर असलेल्या आपल्या पतीसमवेत हैद्राबाद सोडून दिल्लीत येते. राष्ट्रीय चळवळीने प्रभावित होते नि नेहरूंना विचारते की, “मी देशासाठी काय करावं, असं तुम्हाला वाटतं?" नेहरूही तितक्याच मिश्किलपणे उत्तर देतात, “देशासाठी तुला काही करायला सुचवणं धाडसाचं होईल. आपल्या देशात अनाथ, निराधार मुलांसाठी कुणी फारसं जाणिवेने कार्य करताना दिसत नाही. ते काम म्हणजे देशसेवाच आहे." ती युवती हा सल्ला शारोधार्य मानते. स्वातंत्र्य चळवळीच्या क्षणिक रोमांच देणाऱ्या सनसनाटी कार्यात उडी मारण्यापेक्षा अनाथ संगोपनाचे काम तिला अधिक आकर्षक वाटतं. तिने ते करण्याचे जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत व्रतासारखे मनोमन ठरवलं. हे सर्व वाचले, अनुभवले की आपलं आत्मकेंद्रित जीवन किळसवाणं नि निष्क्रिय वाटायला लागते. ती विवाहित युवती म्हणजेच तारा अली बेग.

 अमेरिकन आई आणि बंगाली वडील. विवाह सनातनी मुस्लीम अधिका-यांशी. सारचं आयुष्य असं अचंबित करणारं. देखणं रूप व कुशाग्र बुद्धी असलेल्या ताराजींचा विवाह अवघ्या सोळाव्या वर्षी झाला. पती मुलकी सेनेत उच्च राजनैतिक अधिकारी. त्यामुळे अवघ्या विसाव्या वर्षी सर्व राष्ट्रीय नेते व इंग्रज अधिका-यांचे निकट साहचर्य लाभले. यात त्यांनी निवड केली राष्ट्रीय नेत्यांची नि त्यांच्या आदर्शाची. ब्रिटिशांची सेवा,

प्रेरक चरित्रे/१८