पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/4

हे पान प्रमाणित केलेले आहे.

चरित्रे यांची पहा जरा...

‘प्रेरक चरित्रे' हे माझे छोटेखानी पुस्तक म्हणजे मला प्रेरक वाटणाच्या व्यक्तींविषयी लिहिलेल्या श्रद्धासुमनांची माळ होय. महाराष्ट्राचे शिल्पकार व संस्थापक मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांचा नि माझा कधी प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग आला नाही तरी त्यांना मी अनेक समारंभात ऐकलं, पाहिलं आहे. कळत्या वयात त्यांची आत्मकथा, भाषणे वाचली आहेत. गेल्याच वर्षी त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रकाशित लेख, ग्रंथ आवर्जून वाचून मनन केलेले आहे. राजकीय जीवनात समाज, संस्कृती, साहित्य, सभ्यता व सोज्ज्वळता जपणारा हा नेता मला आपला का वाटतो नाही सांगता येणार. पण एक नक्की की असं नेतृत्व ज्या राज्याला लाभतं ते राज्य सर्वसामान्यांचे हित जपत प्रगती करत राहतं. राजकारणाला अपवाद आदर्श म्हणून त्यांची मजवर मोहिनी आहे खरी!
 सर्वोदयी कार्यकर्ते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांचा मला निकट सहवास लाभला ही माझ्या जीवनाची मोठी जमेली बाजू, मिळकत म्हणायला हरकत नाही. या सा-या व्यक्तींचं विधायकपण व परहितदक्षता यांनी मला नेहमीच कार्यप्रवण बनवलं आहे. समाज नुसता तत्त्व आणि ध्येयांनी मोठा होत नाही. त्यापुढे काही प्रतिदर्श (Model) आदर्श लागतात. वरील दोन्ही चरित्रे या संदर्भात अनुकरणीय म्हणून लक्षात घ्यायला हवी. अण्णासाहेबांनी मला दिलेलं पितृप्रेम मी कधी विसरू शकणार नाही. ते कर्मठ नि पारंपारिक सर्वोदयी नव्हते. त्यांचं प्रागतिकपण हा त्या काळी माझ्या आकर्षणाचा विषय होता नि अनुकरणाचाही!
 श्रीमती तारा अली बेग यांना मी कधी पाहिलं, ऐकलं नाही. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊनच मी त्यांच्याबद्दल लिहिलं. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजकार्य करणं नि तेही जात, धर्मापलीकडे जाऊन करणे ही सोपी गोष्ट नव्हती. महिला व बाल कल्याणासारख्या क्षेत्रात त्या रवींद्रनाथ टागोर,