पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/5

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कमलादेवी चटोपाध्याय व आपले पती अली बेग यांच्यामुळे आल्या खऱ्या, पण त्यांनी वंचितांचं जे कार्य केलं ते आंतरिक उमाळ्याने, बालशिक्षण व बालकल्याण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ही दोन्ही अंगे बळकट झाल्याशिवाय बाल्य सुदृढ व समृद्ध होत नाही, हे भान देणाच्या अनुताईंना भेटलो व एका भेटीत आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला. त्याचं एकमेव कारण आम्हा दोघांतील कार्य साम्य हेच होय. समाजकार्यातील त्या माझ्या बालपणापासूनच्या आदर्श असल्याने त्यांच्या माझ्या संबंधात आई-मुलाचा ओलावा मी सतत अनुभवला आहे.
 ऐन तारुण्यात बाबा आमटे यांचे कार्य पाहिलं. त्यांचा सहवास लाभला व मला माझ्या नाकर्तेपणाची घृणा वाटू लागली. समाजकार्यही एका पुरुषार्थी योद्ध्याप्रमाणे करण्याचा वस्तुपाठ जर मला कोणी शिकवला असेल तर तो बाबा आमटेंच्या जीवन व कार्याने. कळत्या वयात अशा माणसांशी गाठ पडणं हे समाज रासायनिक अभिक्रियेसारखं (Social Chemical Process) असतं. ती ऊर्जा, दृष्टी तुमच्यात सतत विचार वाहात ठेवत कृतीरूप कधी धारण करते तुम्हास कळतसुद्धा नाही. कुष्ठपीडित, अंध, अपंग, वृद्ध सर्व वंचितांप्रति तुम्हाला कळवळा वाटायला तुमच्या संवेदनेचा पाझर जिवंत व जाज्वल्यच असायला लागतो. समाजातील प्रसंग हे ते पाझर फुटण्याची क्षणिक कारणे असतात. स्थायीभाव असतो तो परहितध्यास!
 इव्हान लोमेक्स मला भेटल्या प्रसंगाने पण त्यांनी संवेदी व समर्पित वृत्तीनं माझं गर्वहरण केलं. रस्त्यावरच्या किळसवाणं जीवन जगणा-याला कवटाळणं सिनेमात पाहणं कितीही उदार वाटत असलं तरी वास्तवात ती कृती करणं काळीज असल्याशिवाय शक्य नाही, हे त्यांच्या कामातूनच माझ्या लक्षात आलं. मी काही मोठा कार्यकर्ता नाही; असेन तर एक संवेदी नागरिक. पण या सा-यांची चरित्रं मला नित्य बेचैन ठेवत आलीत. जी काही थोडी कृती माझ्या हातून घडली ती यांच्या चरित्रांमुळे, जीवन, कार्य, प्रेरणेमुळे! ‘चरित्रे यांची पहा जरा' असं म्हणत लिहिलेले हे लेख म्हणजे आपल्यात झालेला संकर, संसर्ग इतरांप्रत परितर्वनार्थ पसरवणे, पोहोचवणे होय. तेवढे जरी झाले, पोहोचले तर ती या लेखनाची मी सार्थकता मानीन.
 ‘अक्षर' प्रकाशनाच्या अमेय जोशींमुळे हे घडू शकले. मी त्यांचा ऋणी आहे.

२० मे, २०१३
डॉ. सुनीलकुमार लवटे