पान:फुलाचा प्रयोग.djvu/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " हे पुस्तक मरायला शिकविते ? "
 " जगायलाही शिकविते. कर्तव्यकर्म करीत सुखाने कसे मरावे तेही ह्यात सांगितलेले आहे. जगणे मरणे म्हणजे झोका. गंमत आहे ती. तुम्ही मोठ्या झालात म्हणजे हे पुस्तक वाचा."
 " परंतु कोण शिकवील वाचायला ?"
 “ तुम्हांला वाचायला येत नाही ? "
 " नाही."
 " का बरे ? "
 " बाबा म्हणतात, शिकल्याने मुली बिघडतात."
 " खोटी कल्पना. ज्ञान म्हणजे परमेश्वर. ज्ञानाने मनुष्य खरा मनुष्य होतो. ज्ञानाने नम्रता येते, निर्भयताही येते. ज्ञानाने अनेक प्रश्न सुटतात, अनेक गोष्टी कळतात. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे, ते तुम्ही मिळवा. "
 " मला देता हे पुस्तक ? मरणालाही आनंदाने मिठी मारावयास शिकविणारे पुस्तक देता मला ? "
 " घ्या हे पुस्तक. मरणाऱ्याची जगणाऱ्याला भेट."
 " ही घ्या दोन फुले. हसत मरणान्याची मला पूजा करू दे."
 इतक्यात ढब्बूसाहेब तेथे आले. ते क्रोधाने लाल झाले होते. ते थर- थरत होते. फाशी जाणान्या माणसाची खोली उघडी होती. भयंकर अपराध तो कैदी पळून गेला तर ? नोकरी जावयाची. जन्माचे वाटोळे व्हावयाचे. कदाचित् शिक्षाही व्हावयाची आपणच कैद्याला फरारी होण्यास साहाय्य केले असा आरोप यावयाचा. स्वतःच फाशी जावयाची पाळी यावयाची.
 " कळ्ये, तू येथे कशाला आलीस ? कैदी पळाला तर ? "
 " बाबा, हा पळून जाणारा कैदी नाही. मरणाला न डरणारा हा महात्मा आहे.
 " काय रे, मरण समोर आहे तरी मुलीजवळ गप्पा मारतोस ? तुला लाज नाही वाटत ? देवाचे नाव घेण्याऐवजी मुलीजवळ बोलत बसतोस ? हरामखोर, निर्लज्ज आहे. पक्का बेरड आहे. मरता मरता फुलपाखरा-.

फुलाला फाशीची शिक्षा २१