पान:फुलाचा प्रयोग.djvu/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " मुळे तुटली. मला किती वाईट वाटले-" कळी सांगत होती.
 " जाऊ दे. आता शेवटचा प्रयोग करू. हा तिसरा तुकडा घे. हा शेवटचा तुकडा तुझ्या खोलीतच एका मोठ्या कुंडीत हा लाव. खिडक्यांना मी सांगेत त्या रंगाचे पडदे लाव. तसा तसा प्रकाश झाडाला मिळू दे. झाड कसे कसे वाढते, कधी खत घातले, प्रकाशकिरण कसे कसे दिले, ते सारे रोजनिशीत लिहीत जा. मी तुरुंगात असलो तरी ज्ञान जगाला कळू दे. ती रोजनिशी तू मग प्रसिद्ध कर, अर्थात जर प्रयोग यशस्वी झाला तर, निळ्या रंगावर सोनेरी छटा उमटल्या तर, आणि कळ्ये, खोली कधी-कधी उघडी टाकू नकोस. कुलूप लावून बाहेर जात जा. प्रयोग कस-कसा होत आहे ते मला सांगत जा ! समजलीस ना ?

" हो तुमच्यासाठी सारे करीन. तुमचा आनंद तो माझा."

 ती निघाली. तो पाहुणा पटकन् निघून गेला. कळीने सांगितल्याप्रमाणे सारे केले. तिने कुंडीत तो तुकडा लाविला. एका मोठ्या घडवंचीवर ती कुंडी तिने ठेवली. खिडक्यांना तांबडे, हिरवे, निळे असे पडदे करण्यात आले. निरनिराळया वेळी रंगांचा प्रकाश खोलीत पडे. खोलीला तिने एक भक्कम कुलूप केले. बाहेर जाताना ते ती लावी.
 त्या पाहुण्याने त्यांचे सारे बोलणे ऐकिले होते. त्याने एके दिवशी त्या कुलुपाच्या तोंडाचा मेणावर ठसा घेतला. त्या तोंडाच्या आकाराची किल्ली त्याने घडवून घेतली. ती किल्ली त्या कुलूपाला लागेल की नाही ते त्याने पाहिले. किल्ली लागली. कुलूप उघडले. आतील कुंडी पाहुण्याने पाहिली." फुलू दे ते फूल. ते पळविल्याशिवाय मी राहाणार नाही. ते लाखाचे बक्षीस मी उपटीन. हा गब्रू मग गबर होईल. माझी कीर्ती जगभर जाईल. हा बसेल येथे तुरुंगात रडत. " असे पाहुणा म्हणाला. तो पाहुणा म्हणजे का तो गब्रू ? हो. अजून नाही का तुमच्या ध्यानात आले ?
 कळी रोज त्या फुलझाडाची सारी हकीगत सांगे. नवीन पान फुटले, नवीन धुमारा आला, सारे सांगे. ती हकीगत ऐकून फुलाला अतोनात आनंद होई.. एके दिवशी कळी म्हणाली, “ एक लहानशी कळी आली आहे ?"


४० फुलाचा प्रयोग