पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/२७

हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग ३
आर्थिक साक्षरते विषयी थोडेसे ...

बचत गटांच काम करताना महिलांशी गप्पा मारताना असं लक्षात यायचं कि बँकेविषयी कमालीची भीती मनात घर करून बसली आहे. ही भीती कसली आहे तर बँकेत फक्त पुरुष असतात, तिथे खूप कागद-पत्र असतात, ओळखीचं कोणीच नसतं, सगळे इंग्रजीतून असतं, तिथली मराठी सुद्धा समजत नाही, टेबला पलीकडचा पूर्ण माणूस दिसत नाही फक्त माणसांच डोकंच दिसतं! ....या कारणावरून बायकांना बँकेत जायला नको वाटायचं !
 बँकेबद्दल किती अज्ञान एकदा तर एक जण बँकेत कामाला गेली नि काम न करताच परत आली का? विचारले असं का केलं तर म्हणाली 'काय काम आहे?' असं कोणी विचारलं सुद्धा नाही!..... एकदा रेश्माने विचारलं, 'ताई बँक खरंच माझे पैसे सांभाळेल?' मी विचारले, 'का गं तुला असा प्रश्न का पडला?' तर ती म्हणाली, 'मी काही श्रीमंत नाही. माझ्याकडे फार पैसे नाहीत...... म्हणून विचारते' बँक ही श्रीमंतांसाठी आहे असा एक समज ग्रामीण भागात आहे हे. तो मुळातूनच दुरुस्त केला पाहिजे म्हणून हा अनुभव कथनाचा प्रपंच!

१ परताव्याचे गणित समजून घेऊ

सगळ्यांनाच श्रीमंत व्हावे असे वाटत असते पण श्रीमंती, समृद्धी अशी काही एका दिवसात येत नाही, आणि जर अशी एकदम आलीच तर अशा संपत्ती पासून सांभाळूनच असलेले बरे. कष्टाने येणारी संपत्ती ही नेहेमी सावकाश येते पण नक्की येते. अशी संपत्ती टिकतेही आणि सुख मिळवून देते.
 सणासुदीच्या दिवसात गावात कधीतरी एखाद्याला कोणीतरी गपचूप येउन सांगतो, 'आज मला दहा हजार रुपये दे तुला वर्षभरात दुप्पट करून देतो.' मोहापोटी एखादा माणूस गुंतवतोही... आपण पाहू या असे म्हणणारा माणूस दहा हजाराला किती दराने व्याज देतो माहिती आहे? वर्षभरात रक्कम दुप्पट होण्यासाठी व्याजदर महिन्याला ६% असावा लागतो. म्हणजे वर्षाला सरळ व्याजाने हिशोब केला तर १२ महिन्याचे (१२ महिने ६% असे) ७२% होतात पण व्याजावर व्याज वाढत जाते त्यालाच चक्र वाढ व्याज म्हणतात.