पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यातील शिक्षण
 १ एप्रिल १८८९ रोजी सदाशिवरावांनी नानासाहेबांना बडोद्यातील बॅच स्कूलमध्ये इंग्रजी पहिलीच्या वर्गात दाखल केले. या वर्गात मराठ्यांची १८ मुले शिक्षण घेत होती. सातत्यपूर्ण अभ्यास करणाऱ्या नानासाहेबांनी आपले शिक्षक देव मास्तरांच्या सांगण्यानुसार अभ्यास करत ६ महिन्यांमध्येच दुसरीची परीक्षा उत्तीर्ण होत तिसऱ्या इयत्तेत प्रवेश मिळविला. त्यावेळी नानासाहेब सदाशिवरावांबरोबर त्यांच्या खोलीत राहत होते. दुर्दैवाने पुढील वर्षभरात सदाशिवरावांचे निधन झाले.
 १८९२ मध्ये इंग्रजी पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतल्यानंतर नानासाहेब बडोदा कॉलेजच्या बोर्डिंगमध्ये राहत होते. या बोर्डिंगमध्ये बडोदा कॉलेज आणि हायस्कूलची मुले राहत असत. यावेळी बोर्डिंगमधील निवास व भोजनासह संपूर्ण शिक्षणाचा खर्च दरमहा १५ रु. इतका अत्यल्प येत असल्याचे निरीक्षण नानासाहेबांनी मांडले आहे. बडोदा संस्थानचे शिक्षण आयुक्त म्हणून निवृत्त झालेले श्री. एन. के. दीक्षित यांचे माध्यमिक शिक्षण ब्रिटिश भारतातील सुरतमध्ये व महाविद्यालयीन शिक्षण बडोदा कॉलेजमध्ये झाले होते. 'बडोदा कॉलेजची फी सुरतमधील हायस्कूलपेक्षा कमी असून आपण बडोद्यातील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ब्रिटिश भारतातील हायस्कूलपेक्षा कमी फी भरल्याची' आठवण दीक्षित यांनीदेखील नोंदवली आहे.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १०