पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचबरोबर बडोदा कॉलेजच्या बोर्डिंगमध्ये कोणीही मनात येईल तेथे जेवावयास बसत असे. १८९५ मध्ये बडोदा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सर्व जातींचे विद्यार्थी कोणतीही जातीय बंधने न पाळता एकत्र राहत असल्याची आठवण नानासाहेबांनी बडोदा कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी स्मारक ग्रंथात नोंदवली आहे. याउलट १८९६ मध्ये कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये फक्त ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सुरू करण्यात आले होते. याव्यतिरिक्त १८९६ मध्येच छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्व जातींसाठी एकत्र वसतिगृह सुरू केले होते; परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे शाहू महाराजांना १९०१ नंतर आपल्या संस्थानात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र २३ वसतिगृहांची स्थापना करावी लागली.
बडोदा फौजेत भरती
 १८९५ मध्ये नानासाहेब मॅट्रिक आणि स्कूल फायनल अशा दोन्ही परीक्षा एकाचवेळी उत्तीर्ण झाले. मराठा जातीतील विद्यार्थी दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण होणे ही त्याकाळात खूप मोठी गोष्ट होती. संस्थानच्या लष्करात अधिकारी पदावर नियुक्त करण्यासाठी सयाजीराव महाराज मॅट्रिक उत्तीर्ण मराठा विद्यार्थ्यांच्या शोधात होते. त्यावेळी बाबूराव चव्हाणांचे स्नेही असणाऱ्या कोल्हापूरच्या लेफ्टनंट विठ्ठलराव गायकवाड यांनी बडोदा फौजेचे सेनापती आनंदराव गायकवाड यांच्याजवळ नानासाहेबांचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी नानासाहेबांसह

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ११