पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकूण ३ मराठा विद्यार्थ्यांना सयाजीराव महाराजांसमोर नेण्यात आले. त्यावेळचा प्रसंग सांगताना नानासाहेब लिहितात, त्यांच्याशी थोडा वेळ बोलणे संपल्यावर शेवटी मला बोलावले. मी माझे नाव सांगताच यंदाच्या मॅट्रिक व स्कूल फायनलमध्ये पास झालेले तुम्हीच का? असा महाराजांनी मला पहिलाच प्रश्न केला. कितीपर्यंत तुमची शिकण्याची उमेद आहे, असे विचारताच बी. ए., एल. एल. बी. होण्याची माझी इच्छा आहे, असे मी सांगितले. “मग पुढे काय करणार", असा प्रश्न होताच “वकिली करणार” म्हणून मी सांगितले. हे ऐकून महाराजसाहेब थोडेसे हसले. मला काय काय खेळ येतात, घोड्यावर बसता येते की नाही, लष्करात नोकरी करणे आवडते की काय, वगैरे आणखी काही प्रश्न केले. तेथून मी परत कॉलेजमध्ये आलो. यापूर्वी मी महाराज साहेबांना पुष्कळ वेळा लांबून पाहिले होते. परंतु बोलण्याचा हा पहिलाच प्रसंग.
 फेब्रुवारी तारीख ६ रोजी शनिवारी मी प्रो. लिटल डेल यांचे Hereward the wake या पुस्तकावर लेक्चर ऐकत पी. ई. च्या वर्गात बसलो असताना तेथे माझ्या नावाचा एक लखोटा आला. तो उघडून पाहता मला रुपये ६० वर मोठ्या खासपागेत अट्टयाची नेमल्याबद्दलचा हुकुम होता.” ८ फेब्रुवारी १८९५ रोजी नानासाहेब खासपागेत नोकरीवर रुजू झाले. यावेळी मराठा उमेदवारांच्या भरतीमागील सयाजीराव महाराजांची भूमिका स्पष्ट करताना

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १२