पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नानासाहेब लिहितात, “शिकलेल्या मराठा तरुणांची फौजेत भरती करून वरिष्ठ दर्जाच्या जागा त्यांना देण्याच्या हेतूने महाराज साहेबांनी ही भरती त्यावेळी सुरू केली होती. फौजेतील हे हिंदीकरण श्री. सयाजीराव महाराज साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी सुरू केले." पुढे ४१ वर्षे नानासाहेबांनी बडोदा लष्करात नोकरी केली.
बडोदा लष्करात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या
 नोकरीस लागल्यानंतर एक वर्षातच एप्रिल १८९६ मध्ये नानासाहेबांचा विवाह त्यांचे मेहुणे बाबूराव चव्हाणांच्या बहिणीच्या मुलीशी झाला. विवाहानंतर दोनच महिन्यात नानासाहेब केशवराव सावंत आणि दिनकरराव शिर्के या मित्रांसह लेफ्टनंटच्या परीक्षेला बसले. या परीक्षेचा अभ्यास करताना नानासाहेब आणि केशवरावांनी एकत्रितपणे इंग्रजी पुस्तकावरून टिपणे तयार केली होती. १०-१२ वर्षांनंतर फौज खात्यातील कवायती कारखान्याचे नियम तयार करण्याची जबाबदारी खात्याने सोपवली असता हीच टिपणे जशीच्या तशीच त्या नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे नानासाहेब आपल्या आत्मचरित्रात सांगतात. केशवराव, दिनकरराव आणि नानासाहेब हे तिघेही मित्र यावेळी लेफ्टनंटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची दरमहा १६५ रु. पगारावर लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली.
बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १३