पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८९८ मध्ये आफ्रिकेतील बोअर लोकांबरोबर चालू असलेल्या युद्धात ब्रिटिश सरकारला सहकार्य म्हणून घोडे पाठविण्याचे भारतीय राजांनी कबूल केले. त्यानुसार सयाजीराव महाराजांकडून ब्रिटिश सरकारला १०८ घोडे देण्यात आले. ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल माँटिथ यांनी पसंत केलेले बडोदा फौजेतील घोडे मुंबईस नेऊन जनरल सर रॉबर्ट लो यांना सुपूर्द करण्याची जबाबदारी नानासाहेबांवर सोपवण्यात आली. त्यानुसार नानासाहेब स्पेशल ट्रेनने घोड्यांना घेऊन मुंबईला गेले. घोडे घेऊन आफ्रिकेला जाणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला इंग्रजीव्यतिरिक्त अन्य कोणतीही भाषा येत नव्हती. अशा परिस्थितीत या अधिकाऱ्याबरोबर जाण्यासाठी अन्य इंग्रजी जाणणारा अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे ऐनवेळी नानासाहेबांना आफ्रिकेत जाण्याची संधी निर्माण झाली; परंतु सयाजीराव महाराजांचा आदेश नसल्यामुळे नानासाहेब त्यावेळी आफ्रिकेला जाऊ शकले नाहीत.
 १९०० मध्ये बडोद्यात मोठ्या खासपागेत कार्यरत असताना नानासाहेब तापाने आजारी पडले. सुमारे ४२ दिवसांच्या डॉ. परांजपेंच्या उपचारानंतर नानासाहेब बरे झाले. या आजारपणात औषधोपचारास आवश्यक खर्चासाठी त्यांना थोडे कर्ज काढावे लागले. ही हकीकत कळताच सयाजीराव महाराजांनी फौजेकरिता स्वतंत्र मिलिटरी मेडिकल ऑफिसर नेमून लष्करी अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी मोफत

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १४