पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपचार करण्याचा आदेश दिला. ही व्यवस्था पुढे बडोद्यात अखंडित चालू राहिली. याच वर्षी नानासाहेब फौजेस आवश्यक घोडे खरेदी करण्यासाठी मुंबईला गेले असता बडोद्यात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी परतलेल्या नानासाहेबांनी वडिलांचे उर्वरित अंत्यविधी केले.
 याचदरम्यान कडी प्रांतातील पिलवाई गावातील राजपुतांनी केलेले बंड मोडून काढण्यासाठी बडोद्याहून फौज पाठविण्यात आली; परंतु या फौजेत नानासाहेबांच्या रिसाल्याचा समावेश नसल्यामुळे त्यांना पिलवाईस जाता आले नाही; परंतु बडोद्याच्या फौजेने एकाच दिवसात हे बंड मोडून काढले. या लढाईत बडोदा फौजेतील एक-दोन शिपाई जखमी झाले; परंतु जीवितहानी झाली नाही.
 तरुण हुशार अंमलदारांना रिसाल्याबरोबरच पलटणीचीही माहिती व्हावी या उद्देशाने १ नोव्हेंबर १९०१ रोजी सयाजीराव महाराजांनी नानासाहेबांची ७ वर्षांच्या नोकरीनंतर मोठ्या खासपागेतून पहिल्या पलटणीमध्ये ॲडज्युटंटपदी बदली केली. या पलटणीमध्ये कार्यरत लेफ्टनंट रंगय्या वर्धय्या या मद्रासी गृहस्थांनी नानासाहेबांना पलटणची परेड शिकवली. या पलटणीच्या कॅप्टनपदी नियुक्ती झालेले श्री. वॉटसन यांचे इंग्रजी शिक्षण इंग्लंडमध्ये झाले होते. कॅप्टन वॉटसन आणि नानासाहेब एकमेकांशेजारी राहत असल्यामुळे रोज रात्री वॉटसन साहेब नानासाहेबांना आपल्या घरी बोलावून लष्करी वाङ्मयावरील

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १५