पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजी पुस्तके वाचायला लावत आणि स्वतः एका लोखंडी खाटेवर पडून ऐकत. नानासाहेबांनी वाचलेला भाग ते त्यांना समजावून सांगत. चार वर्षांच्या सहवासात वॉटसन यांनी सेनापती कचेरीच्या लायब्ररीतील लष्करी वाङ्मयावरील बहुतेक सर्व पुस्तके आपल्याकडून वाचून घेतल्याची आठवण नानासाहेबांनी नोंदवली आहे. याच वॉटसन साहेबांनी आपल्या तीन मुलांच्या नावावर बँकेत सेव्हिंग खाते काढून आपल्याला बचतीची सवय लावल्याचेदेखील नानासाहेब सांगतात.
 नानासाहेबांची पलटणीत बदली झाल्यानंतर त्यांना पलटणीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आदेश देण्यात आला. त्याअगोदर अनेक अधिकाऱ्यांची पलटणीतून रिसाल्यात आणि रिसाल्यातून पलटणीत बदली होत असे. परंतु त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आली नव्हती. नानासाहेबांपासून प्रत्येक अंमलदाराला पुढील पदोन्नतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले.
बडोद्यातील पोलो खेळाची 'पायाभरणी'

 पोलो खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सयाजीराव महाराजांनी पोलो कारखाना हुजराती पागेपासून स्वतंत्र करून त्याच्या देखभालीसाठी समिती नेमली. कॅप्टन जनार्दन सदाशिव हे पोलो कारखान्याचे सेक्रेटरी होते. परंतु त्यांच्या घरापासून पोलो खेळण्याची जागा आणि पोलोच्या घोड्यांचा कारखाना लांब असल्यामुळे कॅप्टन जनार्दन सदाशिव यांना कारखान्याची

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १६