पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फत्तेसिंगरावांबरोबरच खासेराव जाधव व अन्य मित्रमंडळींनीही नानासाहेबांचे सांत्वन केले. २ महिन्यांनंतर फेब्रुवारी १९०५ मध्ये नानासाहेबांना भेटायला आलेल्या नारायणराव घाडगेंनी 'तुम्ही आजकाल राजवाड्यावर येत नसल्यामुळे महाराज सतत तुमची आठवण काढतात, तरी तुम्ही महाराजांना वरचेवर भेटणे गरजेचे असल्या’चे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी नानासाहेबांना राजवाड्यावर महाराजांसोबत जेवणास हजर राहण्याचे आमंत्रण आले. हा प्रसंग वर्णन करताना नानासाहेब लिहितात, “मी राजमहालात गेलो. मला पाहताच महाराजसाहेब म्हणाले की, “अहो रावसाहेब, आपली स्वारी जिवंत आहे का? तुम्ही लोकांनी इतके Thin Skinned असू नये. तुमच्यासारख्या तरुण मंडळीचा आम्हास फार उपयोग करून घ्यावयाचा आहे. माझा बेत तुम्हास विलायतेस अगर जपानास लष्करी शिक्षण घेण्यास पाठवण्याचा आहे.” सातच महिन्यांनंतर सप्टेंबर १९०५ मध्ये नानासाहेबांना ही संधी चालून आली.
फौजेचे मनुव्हर्स (लष्करी संचलन)
 नानासाहेबांनी महाराजांची भेट घेतली त्याच दिवशी सकाळी नानासाहेबांना त्यांच्या ग्वाल्हेर मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या धाकट्या बंधूंचे पत्र आले होते. १५ फेब्रुवारीपासून ग्वाल्हेरच्या फौजेचे मोठे मनुव्हर्स (लष्करी संचलन) चालू होणार असून ते पाहण्यास आपण काही ऑफिसर घेऊन यावे' असे त्यांनी लिहिले होते. ही गोष्ट नानासाहेबांनी महाराजांच्या

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / १९