पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कानावर घातली. महाराजांनी सोबत कोणत्या अधिकाऱ्यांना नेणार असल्याचे नानासाहेबांना विचारले. तेव्हा नानासाहेबांनी कॅप्टन जनार्दन सदाशिव व लेफ्टनंट केशवराव सावंत यांची नावे सुचवली. त्यानुसार जेवण संपताच सयाजीरावांनी लगेच ग्वाल्हेरच्या शिंदे महाराजांना आपले अधिकारी पाठविण्यासंदर्भात तार करण्याचा आदेश सेक्रेटरीला दिला. दुसऱ्या दिवशी शिंदे महाराजांचे उत्तर आल्यानंतर सयाजीराव महाराजांनी तिन्ही अधिकाऱ्यांना मनुव्हर्ससाठी ग्वाल्हेरला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार तिन्ही अधिकारी जाण्याची तयारी करत असताना कॅप्टन जनार्दन यांच्याऐवजी बलदेवप्रसाद पाठक यांना पाठवण्याचा आदेश सयाजीरावांनी दिल्यामुळे जनार्दन सदाशिव यांचा हिरमोड झाला. १६ फेब्रुवारी १९०५ रोजी महाराजांच्या आज्ञेनुसार नानासाहेब, केशवराव सावंत आणि बलदेवप्रसाद ग्वाल्हेरला गेले.
 सुमारे १५ दिवसांच्या मनुव्हर्समध्ये नानासाहेबांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. १९०२-०३ मध्ये दिल्ली दरबारावेळी शिंदे महाराजांशी झालेली नानासाहेबांची मैत्री या दौऱ्यावेळी पक्की झाली. मनुव्हर्स पूर्ण झाल्यानंतर ग्वाल्हेरचे ताबूत पाहण्यासाठी शिंदे महाराजांनी बडोद्याच्या या तिन्ही अधिकाऱ्यांना आठवडाभर ठेवून घेतले; परंतु शिंदे महाराजांचा पाहुणचार घेत विविध विभागांची माहिती करून घेण्यात दंग असणाऱ्या या अधिकाऱ्यांना बडोद्यास लवकर

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २०