पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परत पाठविण्यासाठी सयाजीराव महाराजांनी तार पाठवली. त्यामुळे त्यांना तातडीने परत बडोद्यास यावे लागले. बडोद्यास परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नानासाहेब आणि केशवराव सयाजीरावांना भेटायला गेले. तेव्हा महाराजांनी या दोघांना आपल्यासोबत फिरायला नेले. तेव्हा रस्त्यात महाराजांनी दोघांकडून ग्वाल्हेरमध्ये नवीन पाहिलेल्या आणि शिकलेल्या गोष्टींची माहिती घेतली. त्यानंतर २८ मार्च १९०५ रोजी नानासाहेबांना दुसऱ्या पलटणीमध्ये व केशवरावांना दी गार्डसमध्ये कमांडिंग ऑफिसरच्या पदावर नियुक्त करण्यात आले. पुढे नानासाहेबांनी या मनुव्हर्सची हकीकत सयाजी विजयच्या मराठी अंकातून क्रमश: प्रसिद्ध केली होती. तसेच नानासाहेबांनी या दौऱ्याचा इंग्रजी भाषेतील अहवालसुद्धा सेनापती खात्यामार्फत सयाजीराव महाराजांना सादर केला होता.
 पुढे १९२० मध्ये पुन्हा महाराजा माधवराव शिंदेंच्या खास आग्रहावरून नानासाहेब दोन महिन्यांची रजा घेऊन ग्वाल्हेरच्या फौजेचे मनुव्हर्स (लष्करी संचलन) पाहण्यासाठी गेले. या मनुव्हर्सवेळी नानासाहेबांनी पंच या नात्याने दिलेले अहवाल माधवराव महाराजांना फारच आवडले. त्या अहवालांबद्दल माधवराव महाराजांनी नानासाहेबांची अनेक वेळा प्रशंसा केली. अशा प्रकारचे मनुव्हर्स बडोद्यासही सुरू करावे असे सयाजीराव महाराज वारंवार नानासाहेबांना सांगत. परंतु त्यावेळी नानासाहेब हे केवळ कर्नल पदावर कार्यरत होते. दोनच वर्षांत ऑक्टोबर

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २१