पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९२२ मध्ये अॅक्टिंग जनरल म्हणून निवड झाल्यानंतर फेब्रुवारी १९२३ पासून नानासाहेबांनी बडोदा फौजेचे मनुव्हर्स घेण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी झालेल्या मनुव्हर्सचा अहवाल छापून त्याची एक प्रत नानासाहेबांनी महाराजा माधवराव शिंदेंना पाठवली. माधवराव महाराजांनी हा संपूर्ण अहवाल वाचून योग्य त्या सूचना करत नानासाहेबांना अभिनंदनपर पत्र लिहिले. पुढे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मनुव्हर्स घेऊन नानासाहेब त्याचा अहवाल छापून प्रसिद्ध करत. ग्वाल्हेरच्या फौजेपेक्षा बडोदा फौजेतील अधिकाऱ्यांचा सुशिक्षितपणा आणि युद्धशास्त्रावरील इंग्रजी ग्रंथ वाचण्याची त्यांची सवय यामुळे पुढे मनुव्हर्सचे काम सुलभ पद्धतीने होऊ लागल्याचे मत नानासाहेबांनी नोंदवले आहे. बडोदा फौजेचे मनुव्हर्स पाहून खूश झालेल्या अनेक युरोपियन अधिकाऱ्यांनी दिवाणांजवळ नानासाहेबांचे कौतुक केले.
बडोदा लष्करातील सुधारणा
 बडोद्याच्या फौज खात्यातील ड्रेसी फौजेसाठीचे नियम व्यवस्थितरीत्या तयार करण्यात आले नव्हते. चिटणीस अनंत खंडेराव शिंदे यांच्या हाताखाली दोन स्वतंत्र कारकून देऊन हे नियम आपल्या देखरेखीखाली तयार करून घेण्याची जबाबदारी मिलिटरी सेक्रेटरी पाडगावकरांवर सोपवण्यात आली; परंतु दोन वर्षांमध्ये हे नियम तयार होऊ शकले नाहीत. अखेर तत्कालीन दिवाण केरशारपजी यांनी ड्रेसी खात्याचे नियम तयार न

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २२