पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या अंमलदारांत योग्य देशाभिमान व ज्ञान मिळविण्याची खरी इच्छा असेल, तर हे अंमलदार बनेल तितक्या कमी खर्चात ही मुशाफिरी करून त्याचा योग्य लाभ स्वतः करून घेतील व आपल्या देशबांधवांसही करून देतील, अशी आमची खात्री आहे.”
 महाराजांच्या आदेशानुसार लष्करी अंमलदारांचा हा परदेश प्रवास ४-५ महिन्यांसाठीचा होता; परंतु या दौऱ्यासाठी बडोदा सरकारकडून देऊ करण्यात आलेली मदत कमी असल्यामुळे प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च अंमलदारांना करावा लागणार होता. कुटुंबवत्सल नानासाहेबांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे आपल्या परदेश दौऱ्यासाठी कर्ज काढणे त्यांना प्रशस्त वाटले नाही. त्यामुळे आपल्याला परदेश दौऱ्यावर जाणे शक्य नसल्याचे नानासाहेबांनी २० ऑक्टोबर १९०५ रोजी पत्राद्वारे महाराजांना कळवले. नानासाहेब आणि केशवराव सावंतांनी नकार दिल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य लष्करी अंमलदारांना पाठवण्यात आले. यानंतर नानासाहेबांना पुन्हा बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीवर शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळू शकली नाही. १९३९ मध्ये सेवानिवृत्तीनंतर नानासाहेब स्वखर्चाने युरोप प्रवासाला गेले.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २६