पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे याबद्दल सयाजीरावांनी त्यांना सूचना दिल्या. त्याचवेळी या बदलीमागील खरे कारण स्वतः सयाजीराव महाराजांनी नानासाहेबांना सांगितले. नानासाहेबांची नियुक्ती होण्यापूर्वी धारी पलटणीवर युरोपियन किंवा युरेजियन अधिकारीच कॅप्टन म्हणून पाठवले जात. ही परंपरा खंडित करून तेथे भारतीय कॅप्टन पाठवण्यासाठी नानासाहेबांची नियुक्ती करण्यात आली होती. अशा प्रकारे नानासाहेब धारी पलटणीवर कॅप्टन म्हणून नेमणूक झालेले पहिले भारतीय अधिकारी ठरले. विशेष बाब म्हणजे धारी पलटणीवरील नानासाहेबांच्या नियुक्तीवर बडोद्याच्या रेसिडंटनेसुद्धा आक्षेप घेतला होता. नानासाहेबांनी भेट घेऊन त्यांचा आक्षेप दूर केला.
 धारी येथील पलटणीमध्ये कोकणातील शिपायांची संख्या जास्त होती. या शिपायांना दारूचा शौक जास्त असल्यामुळे त्यांचा सर्व पगार दारूवरच खर्च होत असे. नानासाहेबांनी धारीतील दारूच्या गुत्त्यावर पहारा बसवून दारू घेण्यास येणाऱ्या शिपायांना पकडून आणण्याचा आदेश दिला. त्यामुळे ८ दिवसांतच पलटणीतील दारू पिणाऱ्या शिपायांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. परंतु नानासाहेबांच्या आदेशामुळे दारूविक्री कमी झालेल्या दुकानदाराने प्रांताच्या सुभ्याकडे अर्ज करून पलटणीवर आलेल्या नवीन कप्तानाने दारूबंदी केल्यामुळे शासकीय महसूल भरण्यास असमर्थ असल्याचे कळवले. यावर प्रांताच्या अधिकाऱ्यांनी नानासाहेबांना पत्र लिहून दारूबंदीमुळे

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २८