पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शासकीय महसुलाचे नुकसान होत असल्यामुळे पलटणीच्या लोकांना दारू खरेदी करण्यास आणि पिण्यास परवानगी देण्यास सांगितले. त्यावर दारूचे दुकान गावात असून पलटणीतील शिपायांनी दारू पिऊन गावात दंगा करावा असे वाटत असल्यास तसा लेखी हुकुम पाठवण्यास नानासाहेबांनी पत्राद्वारे कळवले. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोणतेही उत्तर आले नाही. गावातील गुजराती लोक दारूला शिवतसुद्धा नसल्यामुळे दुकानदाराचा व्यवसाय पूर्णपणे पलटणीतील शिपायांवरच अवलंबून होता. अखेर आपला व्यवसाय बंद झाल्यामुळे दुकानदार दुकान कायमस्वरूपी बंद करून निघून गेला. नानासाहेब धारीस असेपर्यंत पुन्हा दारूचे दुकान चालू झाले नाही. त्याचवेळी नानासाहेबांनी शिपायांना बचतीची सवय लावली. त्यामुळे शिपायांनी धारी पोस्टल सेव्हिंग बँकेत बचतीची रक्कम ठेवण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुमारे ३००-४०० नवीन खाती या बँकेत उघडण्यात आली. ५ वर्षांच्या कालावधीनंतर ४ जानेवारी १९१० रोजी नानासाहेबांना कॅप्टनपदी नियुक्त करण्यात आले.
 धारी येथे कार्यरत असताना नानासाहेबांच्या पत्नीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे त्यांचे हिडणे- फिरणे देखील बंद झाले होते. आपली बदली बडोद्यास झाल्यास पत्नीचा उपचार चांगल्या पद्धतीने करता येईल अशी आशा नानासाहेबांना वाटत होती. त्याचवेळी कॅप्टन हार्डी

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २९